अध्यक्ष बदलल्याने आजतरी कोरम भरणार का? महत्त्वाच्या विषयांवर चर्चा शक्य
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाची बैठक कोरमअभावी झाली नाही. मात्र नाटय़मय घडामोडींनंतर अलिकडेच बुडा अध्यक्षांची उचलबांगडी करून नव्याने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार दि. 25 रोजी आयोजित करण्यात आलेली बैठक होणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान अर्थसंकल्प केला जातो. एप्रिल ते मार्च या दरम्यान राबविण्यात येणाऱया विकास कामांसाठी तसेच कार्यालयीन कामाबाबत निधीची तरतूद केली जाते. याला सभागृहात मंजुरी देऊन एप्रिल महिन्यापासून अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निधीचा विनियोग केला जातो. पण बुडा कार्यालयाचे कामकाज गेल्या सहा महिन्यापासून अर्थसंकल्पाविना सुरू आहे. बुडाची बैठक झाली नसल्याने अर्थसंकल्पावर चर्चा झाली नाही. परिणामी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अनेकवेळा बैठक आयोजित करण्यात आली होती. पण कोरमअभावी बैठक झाली नसल्याने आतापर्यंत अजेंडय़ावरील विषय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कोरमअभावी बुडाची बैठक झाली नसल्याने विविध पक्षाच्या नेतेमंडळीनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले होते. आता सोमवार दि. 24 रोजी बुडाची बैठक होणार असून या बैठकीच्या अजेंडय़ावर अर्थसंकल्पाचा मुख्य विषय असून अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये बुडाची बैठक पार पडली होती. त्यानंतर बैठक झाली नसल्याने कामकाज रखडले आहे. काही महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
अर्थसंकल्पाक्यतिरिक्त कणबर्गी योजना राबविण्याबाबतचा विषय घेण्यात आला आहे. कणबर्गी योजनेच्या आराखडय़ाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण आणि विकासकामे राबविण्यासाठी निविदा मागविणे आवश्यक आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. कणबर्गी वसाहत योजना राबविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.