बेंगळूर : राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असून बुधवारी देखील संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण अधिक होते. मागील चोवीस तासांमध्ये 34,281 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 49,953 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात दिवसभरात 468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 23,06,655 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 17,24,438 जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 23,306 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 5,58,890 इतकी आहे. मागील चोवीस तासांत राज्यभरात 1,29,538 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
दोन कोरोना योद्धे ब्लॅक फंगसचे बळी
राज्यात कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बुधवारी दोन कोरोना योद्धय़ांचा ब्लॅक फंगसमुळे मृत्यू झाला. म्हैसूर महापालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणारे विनोद आणि रवी यांचा ब्लॅक फंगसमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी रवी हे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह वाहून नेणाऱया शववाहिकेचे चालक होते. तर विनोद हे सॅनिटायझिंग होणाऱया वाहनावर काम करत होते.