प्रतिनिधी/ पणजी
पणजीत बुधवारी तब्बल नवे 38 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी एवढया महिन्यांमध्ये पहिल्यांदाच पणजीत सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुख्य पणजीत 16, मळा येथे 6, आल्तिनो येथे 4, सांतईनेझ येथे 4, रायबंदर, दोनापावला, मिरामार येथे प्रत्येकी 2, तर करंझाळे व बॉक-द-वॉक येथे प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. अशी माहीती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली. रुग्ण मिळालेल्या सर्व ठिकाणांवर लवकरात लवकर सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. असेही मडकईकर यांनी पुढे सांगितले.
मनपा अर्धा दिवस बंद
बुधवारी पणजी महानगरपालिकेतील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यामुळे मनपा कार्यालय अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच येथे त्वरित सॅनिटायझेशन करण्यात आले. सदर महिला लेखा विभागात कार्यरत होती. मंगळवारी देखील ती कामाला आली होती. याअनुषंगाने प्रामुख्याने या विभागात सॅनिटायझ करण्यात आले.
सुमारे 20 पेक्षा जास्त कर्मचाऱयांची चाचणी
महानगरपालिकेतील लेखा विभागातच महिला कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने या विभागातील जवळपास 20 पेक्षा जास्त कर्मचाऱयांची आता कोरोना चाचणी होणार आहे. त्यांचा अहवाल आल्यांनतरच त्यांना कामावर रुजु करण्यात येणार आहे. तसेच गरज भासल्यास इतरांची देखील चाचणी करण्यात येणार आहे. असेही महापौर मडकईकर यांनी यावेळी सांगितले.