नियंत्रण सैन्याच्या हातात: राष्ट्रपती रोच मार्क ख्रिस्तियन काबोरे कैदेत
औगाडौगू / वृत्तसंस्था
आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात सैन्याने सत्तापालट घडवून आणला आहे. राष्ट्रपती रोच मार्क ख्रिस्तियन काबोरे यांना कैद करत संसद विसर्जित करण्यात आली. तसेच देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. देशाचे नियंत्रण आता सैन्याच्या हातात असून सत्तापालटाची घोषणा राष्ट्रीय वाहिनीवर कॅप्टन सिदसोर कादर औएद्रोओगो यांनी केली आहे.
देशाची सुरक्षास्थिती सातत्याने बिघडत होती आणि सरकार देशाच्या जनतेला एकजूट करू शकत नव्हते. याचमुळे सैन्याने सत्तेवर नियंत्रण मिळविल्याचे कॅप्टन सिदसोर यांनी म्हटले आहे. सैन्याच्या गणवेशात त्यांच्यासोबत बसलेले लेफ्टनंट कर्नल पॉल-हेन्री दामिबा आता बुर्किना फासोचे नवे नेते असतील.
दामिबा यांना डिसेंबरमध्ये राष्ट्रपती काबोरे यांनी देशाचे तिसरे सैन्य क्षेत्राचे कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. त्यांनी पॅरिसच्या मिलिट्री अकॅडमीत शिक्षण घेतले आहे. अलिकडेच त्यांनी वेस्ट आफ्रिकन आर्मीज अँड टेररिजम ः अनसर्टेन रिस्पॉन्सेस नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे.
लोकांकडून सैन्याला समर्थन
सत्तापालटाच्या घोषणेनंतर देशाची जनता सैन्याच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरली आहे. सत्तापालटानंतर देशाची स्थिती सुधारणार असल्याची अपेक्षा लोकांना वाटत आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी सत्तापालट करणाऱया नेत्यांना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे.