वृत्तसंस्था / बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या 74 व्या सामन्यात पवन सेहरावतच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बेंगळूर बुल्सने तेलगू टायटन्सचा 36-31 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने यूपी योद्धा संघावर 36-35 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने थरारक विजय मिळविला.
बेंगळूर बुल्स आणि तेलगु टायटन्स यांच्यातील सामन्यात बेंगळूर संघाचा कर्णधार पवन सेहरावतने सुपर 10 गुणांसह एकूण 12 गुण मिळविले. सामन्याच्या पूर्वार्धात पवनने सुपर 10 गुणांची कमाई केली. शेवटच्या काही मिनिटामध्ये तेलगु टायटन्सला गुण मिळविण्यापासून रोखण्यात बेंगळूर संघाने यश मिळविले. बेंगळूर बुल्सने हा सामना पाच गुणांच्या फरकाने जिंकला. या विजयामुळे बेंगळूर बुल्स संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली असून त्यांनी आपली गेल्या तीन सलग सामन्यातील पराभवाची मालिका खंडीत केली. तेलगु टायटन्सने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ एक सामना जिंकला असून ते गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहेत. या सामन्यातील 10 व्या मिनिटाला तेलगु टायटन्सचे सर्वगडी पहिल्यांदा बाद झाले त्यामुळे हा संघ 7 गुणांनी पिछाडीवर राहिला. मध्यंतरापर्यंत बेंगळूर संघाने तेलगु टायटन्सवर 22-11 अशा गुणांनी आघाडी मिळविली होती. पवनने सुपर 10 गुण घेतल्याने बेंगळूर संघाला मध्यंतरापर्यंत 11 गुणांची आघाडी मिळविता आली. उत्तरार्धातील खेळात तेलगु टायटन्सने बेंगळूर बुल्सचे सर्वगडी बाद केल्याने बुल्सची आघाडी कमी झाली. शेवटच्या मिनिटाला सौरभने आपल्या संघाला आणखी पाच गुणांची आघाडी मिळवून देत तेलगु टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणले.
हरियाणा स्टीलर्स आणि यूपी योद्धा यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत थरारक झाला. हरियाणा स्टीलर्सच्या भक्कम बचावफळीमुळे यूपी योद्धा संघाला हा सामना केवळ एका गुणाने गमवावा लागला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हरियाणा स्टीलर्स पाचव्या स्थानावर आहे. या सामन्यात मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टीलर्सने यूपी योद्धा संघावर 15-14 अशी निसटती आघाडी मिळविली होती. हरियाणा स्टीलर्सतर्फे सर्वोत्तम रायडर रोहित गुलियाने 7 चढाई गुण, मोहितने 5 टॅकल गुण तसेच यूपी योद्धातर्फे सर्वोत्तम रायडर श्रीकांत जाधवने 10 चढाई गुण तर शुभम कुमारने 4 टॅकल गुण मिळविले.