बेंगळूर/प्रतिनिधी
केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळी येथे हिंसक घटना घडवून आणल्याचा आरोप असलेला आरोपी माजी महापौर संपतराज बेपत्ता आहे. त्याचे फरार होणे पोलिसांसाठी एक कोडे बनले आहे.कोरोना झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान त्याच्यावर उपचार करणार्या डॉक्टर आणि नातेवाईकांनाची केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) चौकशी केली.
डॉक्टरांनी संपतराज हॉस्पिटलमधून कधी पळाला हे त्यांना ठाऊक नसल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या नियमानुसार फी भरल्यानंतरच रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात येते. संपतराजने तिन्ही रुग्णालयांचे शुल्क भरलेले नाही.
दरम्यान डॉक्टारांनी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावू नये असे म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच संपतराज फरार झाला म्हणून त्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. दरम्यान, सीसीबीने संपतराजच्या मित्रांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण सर्व मित्रांनी त्यांचे मोबाइल फोन बंद ठेवले आहेत. संपतराजला अटक करण्यासाठी बेंगळूर, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये चार विशेष पथके शोध घेत आहेत.