बेंगळूर / वृत्तसंस्था
बेंगळुरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) तब्बल 35 ऍथलिट्स कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने यावेळी जाहीर केले. राष्ट्रकुल, आशियाईसारख्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत असलेल्या एकाही खेळाडूला बाधा झालेली नाही, ही सुदैवाची बाब असल्याचे प्राधिकरणाने म्हटले.
बेंगळुरातील या प्राधिकरणात ठरावीक अंतराने प्रातिनिधीक स्वरुपात चाचणी घेतली जाते. यानुसार, 175 ऍथलिट व 35 प्रशिक्षक, अशा एकूण 210 जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात 35 जण कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले, असे सूत्रांनी नमूद केले.