प्रतिनिधी / कुंकळ्ळी
बेंदुर्डे-बाळळी येथील भानुदास सोनू गावकर यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री सुमारे पावणेबाराच्या दरम्यान दरड कोसळण्याची घटना घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून घरातील कुणालाही इजा पोहोचली नाही. घरची मंडळी झोपी गेल्यानंतर ही घटना घडली.
काही तरी कोसळल्याचा आवाज भानुदास यांच्या आईला प्रथम कळला व तिने लगेच आपल्या मुलाला जाऊन उठविले. ताबडतोब त्याने प्रथम वीजपुरवठा बंद केला. या घटनेत घराच्या मागील बाजूच्या भिंतीला धक्का बसून भिंत थोडी कोसळली आहे व मुख्य ‘बिम’लाही भेग आली आहे. या घटनेची माहिती भानुदासने वाडय़ावरील प्रभाकर गावकर याला दिल्यानंतर त्याने लगेच बाळ्ळीचे सरपंच राजेश फळदेसाई यांना कल्पना दिली व माती काढण्यास साहाय्य केले.
रविवारी व सोमवारी दिवसभर पोक्लिनच्या साहाय्याने कोसळलेल्या मातीचा ढिगारा हटविण्याचे काम चालू होते. शनिवारी व रविवारी सुट्टीचे दिवस असल्याने सोमवारी केपे मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱयाने भेट देऊन पंचनामा केला व एकूण माहिती जाणून घेतली. आज मंगळवारी पुन्हा भेट देऊन ते एकूण नुकसानाची नोंद करून घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच भानुदास याने या नवीन घरात प्रवेश केला होता.