पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 6 बाद 268 धावा, होल्डरचे 2 बळी
वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
जॉनी बेअरस्टोच्या नाबाद शतकामुळे इंग्लंडने येथे झालेल्या विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 268 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर बेअरस्टो 109 व ख्रिस फोक्स 24 धावांवर खेळत होते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. नवोदित ऍलेक्स लीस (4), झॅक क्रॉली (8), कर्णधार जो रूट (13) व डॅनियल लॉरेन्स (20) झटपट बाद झाल्याने 16 व्या षटकाअखेर त्यांची स्थिती 4 बाद 48 अशी झाली. अष्टपैलू बेन स्टोक्स व बेअरस्टो यांनी डाव सावरणारी खेळी करताना पाचव्या गडय़ासाठी 67 धावांची भागीदारी केली. ही जोडी स्थिरावलीय असे वाटत असतानाच स्टोक्सला जेडेन सीलेसने 36 धावांवर बाद केले. त्याच्या जागी आलेल्या बेन फोक्सने 42 धावांची चमकदार खेळी करीत बेअरस्टोसमवेत सहाव्या गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतर बेअरस्टो व ख्रिस वोक्स यांनी दिवसअखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी सातव्या गडय़ासाठी 54 धावांची अभेद्य भागीदारी केली होती. बेअरस्टोने 190 चेंडूत शतक पूर्ण केले.
इंग्लंड-विंडीज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत असून दोन महिन्यांपूर्वी ऍशेस मालिकेतही इंग्लंडच्या आघाडी फळीकडून अत्यंत निराशाजनक प्रदर्शन झाल्याने त्यांना 0-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातही त्यांच्या प्रारंभीच्या फलंदाजांनी निराशा केली. पण बेअरस्टो पुन्हा एकदा त्यांचा तारणहार ठरला. त्याने एकंदर आठवे व विंडीजविरुद्धचे पहिले शतक नोंदवले. त्याने व फोक्सने दिवसअखेरीस दुसऱया नव्या चेंडूवरील सहा षटके व्यवस्थित खेळून काढली. त्याने आपल्या नाबाद 109 धावांच्या खेळीत 17 चौकार मारले. त्याचे हे सलग दुसरे कसोटी शतक आहे. याआधी ऍशेस मालिकेतील सिडनी कसोटीत त्याने शतकी खेळी केली होती. त्याला स्टोक्स व फोक्स या दोन बेनकडून चांगली साथ मिळाल्याने संघाला सुस्थिती प्राप्त करता आली. रोशने एका अप्रतिम चेंडूवर रूटचा त्रिफळा उडविला. रूटने हा चेंडू बाहेर जाणार, या अंदाजाने सोडून दिला. पण चेंडूने त्याच्या यष्टीवरील बेल्स उडविल्या. विंडीजच्या केमार रोश, जेसॉन होल्डर, युवा वेगवान गोलंदाज जेडेन सीलेस यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले होल्डरने सर्वात किफायतशीर मारा करीत 16 षटकांत केवळ 15 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प.डाव 86 षटकांत 6 बाद 268 ः बेअरस्टो खेळत आहे 109, फोक्स 42, स्टोक्स 36, रूट 13, होल्डर 2-15.