सात टन मांस जप्त, सांगली येथील दोघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
बेकायदा मांस वाहतूक करणारी एक कॅन्टर जप्त करण्यात आली आहे. बुधवारी रात्री यलीमुनवळ्ळी क्रॉसजवळ डीसीआयबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली असून 7 टन मांस जप्त करण्यात आले आहे तर सांगली येथील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
रमजान इलाही शेख (वय 54), सलीम बाशाभाई कलाल (वय 48, दोघेही रा. नुरानी गल्ली, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. निपाणी येथील मुस्ताक बेपारी हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. केए 20 डी 5419 क्रमांकाच्या गुडस् वाहनातून सात टन मांस वाहतूक करण्यात येत होती. डीसीआयबीला या संबंधीची माहिती मिळताच वाहन अडवून मांस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी हा जनावरांचे मांस असल्याचे सांगितले आहे. गोमांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संकेश्वरहुन गुलबर्ग्याला हा साठा नेण्यात येत होता अशी माहिती मिळाली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत 10 लाखांच्या घरात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.