प्रतिनिधी/ मडगाव
नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये सुमारे 450 बेघर परप्रांतीय मजुरांना आसरा देण्यात आला असून या लोकांना स्वच्छतेसंदर्भात अडचणी भेडसावत असल्याची तक्रार आल्यानंतर मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्यासह तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व स्थिती जाग्यावर असल्याचे दिसून आले.
नावेली इनडोअर स्टेडियममध्ये मोठय़ा संख्येने बेघर राहत असून फक्त दोनच प्रसाधनगृहे असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा काहींनी समाजमाध्यमांतून केला होता. नगराध्यक्षा नाईक यांनी त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक गावस यांच्याशी संपर्क साधला व उभयतांनी तेथील सुविधांविषयी पाहणी केली. दोनच प्रसाधनगृहे असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात जवळपास 15 प्रसाधनगृहे असल्याचे या पाहणीच्या वेळी आढळून आल्याची माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली.
वरिष्ठ अधिकारी, बेघरही समाधानी
आपण भेट दिली असता तेथे राज्याचे कर आयुक्त हेमंत कुमार, मुख्य वनपाल संतोष कुमार, ‘आरएनडी’ सचिव चोखा राम असे काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तसेच तेथे आसरा घेतलेल्यांनी पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. येथे आसरा घेतलेल्यांची प्रकृती चांगली असून आवार मोठे असल्याने ते क्रिकेट व अन्य खेळ खेळण्यात मग्न असल्याचे आपणास आढळून आले, अशी माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली.
गरज भासल्यास सुलभ शौचालयाची व्यवस्था
आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. रोजंदारीवर काम करणाऱया कित्येक युवकांनी येथे आसरा घेतलेला असून ते धष्टपुष्ट आहेत. काम नसल्याने बसून राहावे लागत असल्याने ते निराश आहेत. पुढे काही काम मिळेल की नाही याची धास्ती त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे पालिकेच्या मान्सूनपूर्व कामासाठी त्यांना रोजंदारीवरील कामगार म्हणून पालिकेने नियुक्त करावे अशी सूचना पुढे आली आहे. त्यासंदर्भात विचार केला जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.