विविध स्पर्धा, कुस्त्या सार्वजनिक कार्यक्रम रद्द : दसरा कमिटीची बैठकीत माहिती
वार्ताहर/ बेडकिहाळ
येथील कल्याण सिद्धेश्वराचा ऐतिहासिक दसरा महोत्सव कर्नाटकात दुसऱया क्रमांकावर साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनाचे संकट आल्याने हा महोत्सव गावकरी व दसरा कमिटीने शासनाच्या नियम व अटींचे पालन करून साधेपणाने केवळ पारंपरिक व धर्मिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.
याबाबत दसरा कमिटीचे जेष्ठ सदस्य अशोक नारे म्हणाले, यावषी कोरोना संकटामुळे ऐतिहासिक दसरा महोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कमिटीने यावेळेचा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या कोणत्याही निर्देशांचे व नियमांचे उल्लंघन न करता केवळ धार्मिक विधी केले जातील. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महसूल खात्याचे उपनिरीक्षक एस. एन. नेमन्नावर म्हणाले, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे पालन करून महोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन केले. पीडीओ रविकांत यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस माजी ग्रा. पं. अध्यक्ष शंकरदादा पाटील, पीकेपीएसचे माजी अध्यक्ष जनगौडा धड्ड-पाटील, संजय पाटील, अशोक आरगे, शिवाप्पा सुभेदार, बाबुराव चौगुले, बाळासाहेब पाटील, राजेंद्र हणबरट्टी, प्रकाश चौगुले, विलास थरकार, विजय चौगुले, सागर केसरकर, किरण पाटील, प्रशांत पाटील, आप्पासो धकापोगोळ, दादा नारे, वर्धमान शिरगाकवर, बाबासो पाटील, अनिल देशपांडे, कुमार अंबी यांच्यासह दसरा कमिटीचे सदस्य, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. संजय चौगुले यांनी स्वागत तर अमोल पाटील यांनी आभार मानले.