प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेनकोळी पुलाजवळ शनिवारी दुपारी कॅन्टरला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून कॅन्टर पलटी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
टीएन 18 एआर 5070 क्रमांकाचा कॅन्टर बेनकोळी नजीकच्या पुलाजवळ पलटी झाला. महामार्गावर कॅन्टर आडवा झाल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती समजताच यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी प्रथम वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर पेनच्या साहाय्याने कॅन्टर बाजुला काढण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. या संबंधी यमकनमर्डी पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.