प्रतिनिधी / देवगड:
‘ओमटेक असोसिएट’ या बांधकाम आस्थापनेचा आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला पश्चिम बंगाल येथील बांधकाम कामगार धीरेन डुकीराम हलदर (59) याचा मृतदेह आरे येथील एका काजूच्या बागेत झाडाला गळफास लावलेल्या व सडलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथील ओमटेक असोसिएट या आस्थापनेकडे धीरेन हा कामाला होता. आरे गणपतीची वाडी येथे रस्त्याचे काम सुरू होते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने व संचारबंदी असल्याने काम बंद होते. त्यामुळे या कामावरील कामगारांची आरे येथेच राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र 14 एप्रिल रोजी पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने धीरेन हा आपल्या पश्चिम बंगाल येथील कुटुंबाच्या काळजीने मानसिक तणावाखाली होता. 14 एप्रिल रोजी धीरेन हा आपल्या सहकारी कामगारांना काहीही न सांगता निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोधाशोध करूनही शोध लागला नव्हता.
गुरुवारी सकाळी 8 वा. आरे येथील एका काजूच्या बागेमध्ये असलेल्या झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत धीरेन यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या स्थितीत काजू बागेच्या मालकाला आढळून आला. याबाबत त्याने तात्काळ पोलीस पाटील यांना कळविले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, हवालदार तुकाराम पडवळ तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ओमटेकचे सुशील लोके, हेमंत देसाई व समीर पेडणेकर हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून लॉकडाऊनमुळे मृतदेह गावी नेणे शक्य नसल्याने आरे येथीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.