वार्ताहर/ वहागाव
कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील विलास आनंदराव पाटील यांच्या शेतामध्ये ऊस तोडीचे काम सुरू असताना मजुरांना बिबटय़ाचे तीन बछडे सापडले. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. मात्र बछडे जागेवरून न हलवता तेथेच ठेवून तोड बंद करण्यात आली. दुपारी 12 वाजता मादी बिबटय़ाने तेथे येऊन प्रथम दोन बछडे व साडे चार वाजण्याच्या सुमारास आणखी एका बछडा सुखरूपपणे तेथून घेऊन गेली.
तळबीड परिसरात यापूर्वीच बिबटय़ाचा वावर स्पष्ट झाला आहे. या परिसरातील बेलवडे हवेली येथे विलास पाटील यांच्या शेतात मंगळवारी ऊस तोड सुरू होती. त्यावेळी एका ठिकाणी तीन बछडे मजुरांना आढळून आले. हे बछडे अतिशय लहान असून मादीने नुकताच त्यांना जन्म दिला आहे. बछडे दिसताच मजुरांनी शेतमालकास कळवले. सर्वांनी बाजूच्या शेतामध्ये बिबटय़ाची मादी कोठे आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आढळली नाही. नंतर मजुरांनी बछडय़ांना हात न लावता ऊस तोडणीचे काम सुरू ठेवले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबटय़ा आला. तीनपैकी दोन पिल्लांना घेऊन गेला. ही घटना मजुरांनी पाहिल्यानंतर मजुरांची भंबेरी उडाली. एक बछडा राहिलेला असताना सायंकाळी शेतात शांतता निर्माण झाल्यानंतर मादी पुन्हा तेथे आली आणि तिसऱया बछडय़ास घेऊन गेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या परिसरात बिबटय़ाचे दर्शन रात्रीचे होत होते. परंतु दिवसा बिबटय़ा दिसल्याने या परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी जाणे जोखमीचे बनले आहे. गेल्या अनेक दिवसापासून तळबीड, वनवासमाची, वहागाव, बेलवडे या चारही गावांमधील शिवराममध्ये बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. वनखात्याने या परिसरामध्ये सापळा रचून बिबटय़ाला पकडावे, अशी मागणी होत आहे. बिबटय़ाच्या भीतीने शेतातील कामे बंद पडण्याची शक्यता आहे.
मारूल हवेलीत सापडलेल्या आजारी बिबटय़ाचा मृत्यू
पाटण तालुक्यातील मारुल हवेलीजवळ गांधी टेकडी शाळेच्यालगत रानात एक बिबटय़ा पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना तसेच वनक्षेत्रपाल विलास काळे यांना मिळाली. हा बिबटय़ा आजारी असल्याने त्यास उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
बिबटय़ा असल्याची माहिती मिळताच सकाळी 8.30 वाजता कराडहून पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय हिंगमिरे, रोहन भाटे, विलास काळे हे रवाना झाले.
घटनास्थळी वनरक्षक बर्गे व वनमजुर हे पोहोचलेले होते. पिंजरा नेण्यात आला होता. सदर रानात बिबटय़ा पडलेला होता. त्याच्या हालचाली अतिशय मंद होत्या.
बिबटय़ा ही 1.5 वर्षाची मादी होती. वजन साधारण 30 किलो होते.
ती चालत न्हवती मात्र जोर जोरात श्वास घेत होती. घटनास्थळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय हिंगमिरे यांनी तपासणी करून काही जीव वाचवण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यावेळेस बिबटय़ाचे शरीर हे खूप गरम होते. इंजेक्शन देऊन बिबटय़ास पिंजऱयात घालून अधिक उपचारासाठी कराड येथे हलविले.
कराड येथे आल्यावर पुन्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोर्डे, डॉ. हिंगमिरे व इतर सहकाऱयांनी तपासणी केली. त्या वेळेस बिबटय़ास 106 ताप होता. उपचारादरम्यान बिबटय़ास जोरात फिट आल्याने तो मृत्युमुखी पडला. शवविच्छेदन केले असता त्यास निमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. बिबटय़ाचे सर्व अवयव दात, मिशा, नखे हे सुस्थितीत होते. त्याचे दहन करण्यात आले.