ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे गती : तीन शिफ्टमध्ये कामाला पुन्हा सुरुवात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देत बेळगावमधील औद्योगिक क्षेत्र पूर्वपदाकडे वाटचाल करीत आहे. ऑटोमोबाईल, मेटल, फूड प्रोसेसिंग, मेकॅनिकल या क्षेत्रांमध्ये गती आल्यामुळे बेळगावमधील उद्योगांना काम मिळू लागले आहे. सध्या बेळगाव परिसरातील 90 टक्के उद्योग सुरू झाले असून जानेवारीपर्यंत सर्वच उद्योग पुन्हा सुरू होण्याची शक्मयात वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊन काळात उद्योगांमधील उत्पादन थांबल्याने शेकडो कोटी रुपयांचा तोटा उद्योगक्षेत्राला सहन करावा लागला होता. उद्योगांची चाके थांबल्याने कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला. अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतले. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून जिल्हय़ात पुन्हा उद्योग सुरू करण्यात आले. काही कामगार घेऊन उद्योग कासवाच्या गतीने सुरू झाले.
बाहेरून येणाऱया ऑर्डर ठप्प असल्यामुळे त्यातच कुशल कामगार गावी परतल्याने जून, जुलै महिन्यात 30 ते 40 टक्के उद्योग सुरू ठेवण्यात आले होते. ऑर्डर मिळू लागल्यानंतर उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांना गाडय़ा करून पुन्हा बेळगावमध्ये आणले. वाहन निर्मिती उद्योगांना चालना मिळाल्यामुळे फाऊंड्री पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात आल्या. त्यामुळे मोठय़ा उद्योगांचे पुन्हा 3 शिफ्टमध्ये काम सुरू झाले आहे.
बीएस-6 वाहन निर्मितीमध्ये वाढ
वाहनांमध्ये बीएस-6 हे नवीन इंजिन बसविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पर्यावरणीयदृष्टय़ा व इंधनाचा कमी वापर करणारे हे इंजिन बसविण्यात येणार असल्याचे आदेश डिसेंबर 2019 मध्ये देण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून जुन्या बीएस-4 या इंजिनाचे उत्पादन थांबविण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने उत्पादन पूर्णपणे बंद होते. परंतु लॉकडाऊन खुले होताच आता बीएस-6 इंजिनची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होत असल्याने बेळगावमध्ये कारखान्यांना मोठय़ा प्रमाणात काम उपलब्ध होत आहे.
निर्यातीत वाढ
कोरोनामुळे परदेशात होणाऱया निर्यातीला ब्रेक लागला होता. त्यातच भारत व चीन यांच्यातील संबंध ताणले गेल्यामुळे अनेक उद्योगांवर त्याचा परिणाम जाणवला. कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी झाल्यामुळे परदेशात होणारी निर्यातही वाढली आहे. बेळगावमध्ये अनेक नामांकित वाहनांचे सुटे भाग तयार केले जातात. ते भाग देशाबरोबरच परदेशातही पाठविले जातात. सध्या अशा सुटय़ा भागांची निर्यात मोठय़ा प्रमाणात केली जात आहे.
कच्च्या मालाच्या प्रकियेला गती
-प्रवीण पाटील (लघुउद्योजक)
लॉकडाऊननंतर परिस्थिती पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाटय़ाने उत्पादन सुरू झाल्याने बेळगावमधील कच्च्या मालाच्या प्रकियेला गती आली आहे. त्यामुळे बेळगावमधील लघुउद्योगांना चांगले काम मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले.