प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह देशातील 5 विमानतळांवर फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली जाणार आहे. फ्लाईंग अकॅडमीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून डिसेंबर 2021 पर्यंत बेळगाव विमानतळावरील फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी कार्यान्वित होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे यांनी दिली.
एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही टेनिंग अकॅडमी सुरू केली जाणार आहे. बेळगावसह जळगाव, गुलबर्गा, खजुराहो व लिलाबरी येथे फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली जाणार आहे. भविष्यात मोठय़ा प्रमाणात पायलटची आवश्यकता भासणार असल्याने या टेनिंग अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना या टेनिंगचा उपयोग होणार आहे. एशिया-पॅसिफिक, जेट सर्व्ह, रेडबर्ड, सॅमवर्धने आणि स्कायनेक्स यांना निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. देशभरातील या 5 विमानतळांची निवड करताना काळजीपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे. हवामान, सिव्हिल, मिलिटरी व प्रवाशांची ये-जा पाहूनच निवड करण्यात आली आहे. हे फ्लाईंग ट्रेनिंग सुरू झाल्यास त्याचा फायदा बेळगावच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.