जुनेबेळगाव येथील शिवप्रेमींचा अनोखा कलाविष्कार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये शिवप्रेमींची कमी नाही. तरुण वेगवेगळय़ा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. भव्यदिव्य किल्ल्यांच्या प्रतिमा बेळगावमध्ये बनविल्या जातात. शिवप्रेमींनी एकत्रित येऊन तब्बल दहा फूट उंच व 350 चौरस फूट जागेमध्ये भव्य किल्ला साकारला आहे. अफझलखानाची स्वराज्यावर चाल या विषयावर आधारित किल्ल्यांची माळ जुनेबेळगाव येथील शिवप्रेमींनी तयार केली आहे.
जुनेबेळगाव येथील शिवतलवार ग्रुपने तीन महिने मेहनत घेऊन किल्ला साकारला आहे. किल्ले प्रतापगड, महाबळेश्वर, श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूरचा किल्ला असे सर्व एकत्रित किल्ले तरुणांनी बनविले आहेत. अफझलखान स्वराज्यावर आक्रमणासाठी आला त्या इतिहासाची आठवण किल्ल्यांच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न शिवभक्तांनी केला आहे. तब्बल 9 डंपर माती व 1 डंपर शेडूचा वापर करून हा किल्ला साकारला आहे. मंगेश खानापूरकर, निरंजन मंडोळकर, आनंद मंडोळकर, भरत शिंदे, दर्शन लोकुळकर, अमोल कोळी, सचिन बिर्जे, दर्शन मोरे आदींनी किल्ला उभारला आहे.
शिवतलवार गुपने जुनेबेळगाव-वडगाव येथील साई हॉस्पिटलसमोर साकारलेला हा किल्ला 20 जानेवारीपर्यंत सायंकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत पाहता येणार आहे.