नागरिकांमधून जोर धरतेय मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे केंद्रीय विमान प्राधिकरण गांभिर्याने पाहताना दिसत नाही. बेळगावमधून दिल्लीला ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु थेट विमानसेवा नसल्याने त्यांनी एकतर बेळगाव-हैद्राबाद-दिल्ली, बेळगाव-बेंगळूर- दिल्ली किंवा बेळगाव-पुणे-दिल्ली अशा कनेक्टिंग विमानांद्वारे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बेळगाव ते दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीचे मुख्यालय बेळगावमध्ये आहे. या ठिकाणी जवानांचे प्रशिक्षणदेखील चालते. त्यामुळे देशभरातील जवानांची बेळगावला ये-जा असते. बेळगावमध्ये एअरमन स्कूलदेखील आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून लष्करी जवान व अधिकारी बेळगाव-दिल्ली असा प्रवास करताना दिसत आहेत. परंतु थेट सेवा नसल्याने ते इतर शहरांमधून प्रवास करीत आहेत. त्यामुळे या जवानांमधूनही दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव विमानतळाचा समावेश उडानअंतर्गत झाल्यामुळे सर्वसामान्यांना विमानप्रवास करणे सहज शक्मय झाले. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांना बेळगावमधून विमानसेवा उपलब्ध आहे. दिल्ली शहरालाही विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी यासाठी सोशल मीडियावर अभियानही उघडण्यात आले होते. लोकप्रतिनिधींनाही या संदर्भात निवेदने देण्यात आली आहेत. त्यामुळे बेळगाव-दिल्ली विमानसेवा केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा आता प्रवाशांना आहे.
हुबळीवरून सेवा, मग बेळगाववरून का नाही?
दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून थेट दिल्ली येथे विमान उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना इतर शहरांमधून दिल्ली गाठावी लागत होती. बेळगावच्या शेजारी असणाऱया हुबळी विमानतळावरून स्टार एअरने आठवडय़ातील काही दिवस दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. लॉकडाऊनपासून ही सेवा बंद आहे. हुबळीपेक्षा प्रवासीसंख्या अधिक असणाऱया बेळगाववरून दिल्ली शहराला विमानसेवा का नाही? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.