ट्रू जेट कंपनीचा पुढाकार, ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ते चेन्नई या दरम्यान विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी ट्रू जेट कंपनीने पुढाकार घेतला असून, येत्या 1 ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव-चेन्नई व्हाया म्हैसूर असे हे विमान असणार आहे. यामुळे बेळगावचे नागरिक आता बेळगाव – चेन्नई असा विमान प्रवास करू शकणार आहेत.
दक्षिण भारतातील एक महत्वाचे शहर म्हणून चेन्नईची ओळख आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात या शहराने मोठी प्रगती केल्यामुळे बेळगाव व आसपासच्या परिसरातील अनेक अभियंते हे नोकरीसाठी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे बेळगाव-चेन्नई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या मार्गासाठी ट्रू जेटने पुढाकार घेतला असून, बेळगाव ते म्हैसूर व म्हैसूर ते चेन्नई अशी विमान सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
या विमान सेवेमुळे बेळगावच्या विकासाला उभारी मिळणार आहे. कर्नाटकाची उप राजधानी व तामिळनाडूच्या राजधानीमध्ये विमान सुरू झाल्यास त्याचा फायदा या दोन्ही शहरांना होणार आहे. बेळगावमधून निघालेले विमान म्हैसूर येथे पोहोचल्यानंतर 20 मिनीटाचा थांबा असणार आहे. त्यानंतर हेच विमान चेन्नईच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. ट्रू जेट कंपनीने संकेत स्थळावरून दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर पासून ही विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव -म्हैसूर ही विमान सेवा दररोजच असली तरी बेळगाव – चेन्नई ही विमानसेवा आठवडय़ातून तीन दिवस असणार आहे. मंगळवार, गुरूवार व शनिवार असे तीन दिवस ही विमानसेवा असणार आहे. यामुळे बेळगावच्या विमान प्रवाशांना ही आनंदाची बातमी असून, थेट विमानसेवा नसली तरी व्हाया म्हैसूर चेन्नई शहराला प्रवास करता येणार आहे.