प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा हा एक मोठा जिल्हा आहे. सीमाभागामध्ये वसलेला आहे. हा जिल्हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र मी या जिह्यातीलच असून बेळगावबाबत बरीच माहिती आहे. याचबरोबर यापूर्वी मी महापालिका, महापूर आणि कोरोनाबाबत काम केले आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी अनुभव आहे. त्यामुळे निश्चितच चांगले काम करु, असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे मावळते जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्याकडून स्वीकारली आहेत. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यापूर्वी बागलकोटच्या जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर गदगचे जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2018 मध्ये त्यांनी सुत्रे स्वीकारली. त्यांनी दीड वर्षांहून अधिक काळ सेवा बजावून आता बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले आहेत.
गदग येथे आलेल्या पूर स्थितीचा तसेच कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे बेळगावमध्येही ते त्या अनुभवाच्या जोरावर काम करणार यात शंका नाही. 1991 मध्ये केपीएससी, 2015 मध्ये कर्नाटक सरकारकडून प्रमोटेड आयएएस घेऊन त्यांना बढती मिळाली. हुबळी- धारवाड बीआरटीएस कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदीही त्यांनी काम केले आहे. त्यांना कामाचा बराच अनुभव असल्याने बेळगाव जिह्याला त्याचा फायदा होणार आहे.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी हे मंगळवारी निवृत्त झाले. त्यांनी नुतन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देवून स्वागत केले. यावेळी विविध अधिकारी उपस्थित होते.