क्हीएसएसचा वापर : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकावर तिसऱया डोळय़ाची करडी नजर असणार आहे. इंडियन रेल्वे व रेलटेल यांच्या माध्यमातून आय पी बेस्ड व्हिडिओ सर्व्हिलियन्स सिस्टीम (व्हीएसएस)चा वापर करून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत ही नवीन यंत्रणा बसविली आहे. विशेषतः चोरी, लहान मुलांचे अपहरण, महिलांशी गैरवर्तन अशा गोष्टींना आळा बसविण्यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
रेल्वे विभागाने देशभरातून महत्त्वाच्या 813 रेल्वे स्टेशनवर व्हीएसएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 47 रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. तर उर्वरित रेल्वेस्थानकांवर मार्च 2022 पर्यंत सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.
रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींची संपूर्ण माहिती नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टममध्ये साठविली जाणार आहे. आय पी कॅमेऱयामुळे एखादी घटना झूम करून स्पष्टपणे पाहण्यास मदत होईल. नैर्त्रुत्य रेल्वे विभागामध्ये बेळगाव, हुबळी, शिमोगा, हासन, दावणगिरी, बंगारपेट, केंगेरी, बेंगळूर कॅन्टोन्मेंट, वास्को, होस्पेट, बळ्ळारी या रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले असून गदग, विजापूर, म्हैसूर या ठिकाणी अद्याप काम सुरू आहे. एकूण 340 कॅमेरे बसविण्यात येणार असून 8.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.