प्रतिनिधी /शिरोडा
फोंडय़ाहून मडगावकडे जाणारा अवज कंटेनर ट्रक टॉपकोला बोरी येथील जंक्शनजवळ असलेल्या दोन दुकानांवर धडकला. राज्यव्यापी कर्फ्यूमुळे सांयकाळच्यावेळी ही दुकाने बंद होती व रस्त्यावर कुणीच नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास फोंडा-मडगाव महामार्गावर हा अपघात झाला. सदर कंटेनर फोंडाहून मडगावच्या दिशेने जात होता. टॉपकोला बोरी जंक्शनजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा कंटेनर बाजूच्या मुराली जनलर स्टोअर्स आणि रावजी जनरल स्टोअर्स या एकाच रांगेत असलेल्या दोन दुकानांवर धडकला. त्यात या दोन्ही दुकानांची काही प्रमाणात नुकसानी झाली. मडगाव-फोंडा महामार्गावर सांयकाळच्या वेळी नेहमीच वर्दळ असते. शिवाय टॉपकोला-बोरी जंक्शनवरही लोकांची गर्दी असते. सध्या कर्फ्यूमुळे दुपारनंतर हा परिसर सामसूम होता. अपघातानंतर महामार्गावरी वाहतूक काहीवेळ खोळंबली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.