चेन्नई / वृत्तसंस्था
ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने व जिम्मी नीशम हे न्यूझीलंडचे क्रिकेटपटू शुक्रवारी भारतात दाखल झाले आहेत. आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, हे तिन्ही खेळाडू मुंबई इंडियन्स संघात रुजू होतील.
यापूर्वी, आयपीएलच्या 13 व्या हंगामात बोल्टने अतिशय भेदक मारा साकारत 25 बळी घेतले होते. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत तो त्यावेळी तिसऱया स्थानी होता. जिम्मी नीशमने देखील न्यूझीलंडला मागील काही टी-20 सामने जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. मुंबई इंडियन्सने ट्वीट करत या तिघांचे स्वागत केले.
आजवर पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया मुंबई इंडियन्सचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी साकारण्यात कमालीचा यशस्वी ठरला असून हीच त्यांची जमेची बाजू राहिली आहे. मागील आयपीएल फायनलमध्ये त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा सहज धुव्वा उडवला होता. यंदाही अशीच विजयी घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि या मोहिमेत बोल्ट, मिल्ने व नीशम यांचे योगदान महत्त्वाचे ठरु शकते.
कर्णधार रोहित शर्मा उत्तम बहरात आहेच. शिवाय, हार्दिक पंडय़ा, जसप्रित बुमराह, कृणाल पंडय़ा, सुर्यकुमार यादव व केरॉन पोलार्ड यांच्यासारखे दिग्गज खेळाडू संघात असल्याने मुंबईचे पारडे जड रहात आले आहे. मुंबईने यापूर्वी 2013, 2015, 2017, 2019 व 2020 या वर्षी आयपीएल जेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचा या संघाचा प्रयत्न असणार आहे.