पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
वृत्तसंस्था / जयपूर
प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या प्रमुख राजयोगिनी दादी हृदयमोहिनी यांचे गुरुवारी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. निधनसमयी त्या 93 वर्षांच्या होत्या. ब्रह्माकुमारीच्या माहिती संचालिका बी. के. करुणा यांनी हृदयमोहिनी यांच्यावर मागील 15 दिवसांपासून मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती दिली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.
राजयोगिनी दादी हृदयमोहिनी यांना सामाजिक सशक्तीकरणाच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी स्मरणात ठेवले जाणार आहे. त्यांनी जागतिक स्तरावर ब्रह्माकुमारीच्या परिवाराचा सकारात्मक संदेश फैलावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या निधनाने दुःखी असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. एक वर्षापूर्वी दादी जानकी यांच्या निधनानंतर हृदयमोहिनी यांना संस्थेच्या मुख्य प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हृदयमोहिनी यांचे पार्थिव आबू रोड येथील संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयात आणण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी लोकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. तर 13 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती करुणा यांनी दिली आहे.