लसींना मान्यता देताना उडाली धांदल
दक्षिण अमेरिकेतील वैज्ञानिकदृष्टय़ा सर्वात पुढारलेला देश अशी ब्राझीलची ख्याती आहे. मात्र, या ख्यातीला आता बट्टा लागला आहे. स्वतःच्या विज्ञाननिष्ठेचा अभिमान बाळगणाऱया या देशाला कोरोनाचे ग्रहण लागले असून त्यामुळे तेथील सरकार अनेकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. कोरोना कधी हटणार, हा एकच प्रश्न या देशात ज्याच्या त्याच्या तोंडी असून प्रशासन टीकेने हैराण झाले आहे.
या कारणास्तव तेथील प्रशासनाची लस संमत करण्यासाठी धांदल सुरू आहे. या देशातील शास्त्रज्ञ लस संशोधन करीत आहेतच. पण अद्याप सार्वत्रिक लसीकरणे केले जाऊ शकेल अशा योग्यतेची लस तेथे निर्माण झालेली नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे जगात इतरत्र निर्माण झालेल्या लसींना आयात अनुमती देण्यावर येथील सरकारचा भर आहे. पण त्यामुळेही समस्या सुटण्याची चिन्हे नाहीत.
आतापर्यंत मान्यता नाही
ब्राझील सरकारने आतापर्यंत एकाही लसीला अधिकृत मान्यता दिलेली नाही. प्रतिदिन या देशात 60 हजारांहून अधिक नवे रूग्ण सापडत आहेत. रूग्ण दुप्पट होण्याचा वेगही वाढत आहे. आज या देशात भारताखालोखाल एकंदर रूग्णसंख्या आहे. मात्र भारताची लोकसंख्या या देशाच्या सात पट अधिक आहे. ही बाब लक्षात घेता ब्राझीलमध्ये रूग्णसंख्येची स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते.
चीनच्या लसीचा वाद
ब्राझीलने प्रथम चीनी लस उपयोगात आणण्याच्या प्रस्तावावर विचार केला. तथापि, जगात आज चीनसंबंधी विश्वासाठी भावना नाही. त्यामुळे ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो यांनी ही लस नाकारली. तथापि, या देशातील काही प्रांतांनी ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे प्रांत आणि मध्यवर्ती सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
जनता संतप्त
प्रशासनाला लसीसंबंधी कोणता निर्णय घ्यावा हे उमजेनासे झाले आहे, अशी जनतेची समजूत झाली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून सरकार दबावाखाली आल्याने त्याचा अधिकच गोंधळ उडाला आहे.