वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारीदरम्यान ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांना सहकारी जीना कोलाडंगेलो यांच्यासोबतचे कथित अफेयर महागात पडले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या पार्श्वभूमीवर हॅनकॉक यांनी रविवारी राजीनामा दिला आहे.
हॅनकॉक यांनी स्वतःच्या राजीनाम्याचे पत्र पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पाठविले आहे. या महामारीत सर्वसामान्य लोकांनी केलेला त्याग पाहता आम्ही त्यांच्यासोबत काही चुकीचे करत असल्यास प्रामाणिक राहणे ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
42 वर्षीय हॅनकॉक विवाहित
42 वर्षीय हॅनकॉक यांच्या विवाहाला 15 वर्षे झाली आहेत. मार्था आणि त्यांना 3 मुले देखील आहेत. तर ज्या महिला सहकाऱयासोबत त्यांच्या अफेयरची चर्चा आहे ती देखील विवाहित आहे.
मंत्रालयात दिली होती नोकरी
जीना कोलाडंगेलो यांनीही आरोग्य मंत्रालयातील स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या नियुक्तीवरून हॅनकॉक यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. कोलागंडेलो यांना सप्टेंबर 2020 मध्ये आरोग्य मंत्रालयात बिगर-कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. हॅनकॉक यांनी जीना यांना 15 हजार पौंड वार्षिक वेतनावर नियुक्त केले होते. त्यांना वर्षातून केवळ 15 ते 20 दिवस काम करावे लागणार होते.
महाविद्यालयापासून मित्र
हॅनकॉक आणि कोलागंडेलो हे ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असल्यापासून मैत्री राखून आहेत. जीना यांच्या नियुक्तीवेळी विरोधी पक्षांनी मंत्री हॅनकॉक यांच्यावर स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याच आरोप केला होता. करदात्यांसोबत हा अन्याय असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले होते.
मागितली होती माफी
मॅट हॅनकॉक आणि त्यांची प्रेयसी जीना यांचे एक वादग्रस्त छायाचित्र समोर आले होते. हे छायाचित्र व्हायरल झाल्यावर हॅनकॉक यांच्या विरोधात लोक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात होती. पण हॅनकॉक यांनी राजीनामा देण्यास नकार देत कोरोनासंबंधी नियमांच्या भंगावरून माफी मागितली होती. दोघांचे छायाचित्र 6 मे रोजीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.