लंडन / वृत्तसंस्था :
ब्रिटनच्या सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांनी सोमवारी राजघराण्याच्या स्वतःच्या वैयक्तिक निवासस्थानी म्हणजेच सॅन्ड्रिंघम इस्टेटमध्ये तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत राजपुत्र हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराण्याचा वारसा सोडण्याच्या मुद्दय़ावर पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. याचबरोबर दोघांच्या भविष्यातील जबाबदारींसंबंधीही चर्चा होणार आहे. राजघराण्याचे सदस्य असणाऱया जोडप्याने बुधवारी राजघराण्याचा वारसा त्यागण्याचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला होता.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राजपुत्र हॅरी (डय़ूक ऑफ ससेक्स), त्यांचे बंधू विलियम (डय़ूक ऑफ कॅम्ब्रिज) आणि त्यांचे वडिल चार्ल्स (प्रिन्स ऑफ चार्ल्स) यांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. तर मेगन मर्केल सध्या कॅनडात असून दूरध्वनीच्या माध्यमातून या बैठकीत सामील होणार आहेत. दांपत्याच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच महाराणींच्या उपस्थितीत राजघराणे या मुद्दय़ावर चर्चा करणार आहे.
हॅरी-मेगन यांनी संबंधित निर्णयाबद्दल राजघराण्याच्या कुठल्याच सदस्याशी चर्चा केली नसल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयावर महाराणी यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. तर हॅरी यांचे बंधू विलियम यांनीही या निर्णयावर नाराजी प्रकट केल्याचे सांगण्यात येते.
चर्चेद्वारे हॅरी आणि मेगन यांच्या राजघराण्याशी असलेल्या नात्यांमध्ये नवे वळण मिळणार असल्याची अपेक्षा केली जात आहे. महाराणी लवकरात लवकर या प्रकरणी तोडगा काढू इच्छित आहेत. पण चर्चेच्या मार्गात अनेक अडथळे उद्भवण्याची शक्यता आहे. बैठकीत हॅरी आणि मेगन यांच्यासंबंधी महाल, ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी आणि कॅनडा सरकारने मिळून तयार केलेल्या प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते. दोघांच्याही भविष्यातील वाटचालीबद्दल बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
नव्या ससेक्स रॉयल चॅरिटीच्या माध्यमातून धर्मादाय कामे सुरूच ठेवणार असल्याचे हॅरी आणि मेगन यांनी म्हटले आहे. मागील वर्षी जून महिन्यात डय़ूक आणि डचेस ऑफ कॅम्ब्रिज फौंडेशनपासून विभक्त झाल्यावर त्यांनी ससेक्स रॉयल चॅरिटीची स्थापना केली होती.