वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांची टोळी चालविणारा आरोपी किशन सिंगला रविवारी रात्री उशिरा ब्रिटनमधून भारतात आणले गेले आहे. लंडनच्या एका न्यायालयाने भारताच्या मागणीवर आरोपी किशनच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. किशन सिंग मूळचा राजस्थानचा रहिवासी असून त्याने ब्रिटनचे नागरिकत्वही मिळविले होते.
आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांची टोळी चालविणारा आरोपी किशन सिंगला भारतीय अधिकाऱयांच्या विनंतीनुसार 23 ऑगस्ट 2018 रोजी ब्रिटनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. तर पुढील काळात जामिनावर मुक्त करण्यात आले होते. पण भारताच्या मागणीवर वेस्टमिंनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने किशन सिंगच्या विरोधात भारताकडून उपलब्ध करण्यात आलेले पुरावे योग्य मानून प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती.
भारतात निष्पक्ष सुनावणी होणार नसल्याचा युक्तिवाद किशन सिंगने न्यायालयासमोर केला होता. पण न्यायालयाने त्याचा युक्तिवाद योग्य न मानून भारतातील प्रत्यार्पणास मंजुरी दिली होती. किशन सिंगवर रेव्ह पाटय़ांमध्ये वापर होणाऱया ‘म्याऊ-म्याऊ’ म्हणजेच मेफेड्रोन ड्रग्स पुरविण्याचा आरोप आहे.