प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक बेकायदेशीररित्या खैर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक येथील पोलिसांनी पकडला. लाखो रूपये किंमतीच्या खैर साठय़ासह ट्रक पोलिसांनी जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी दोघेजण फरारी असून रविवारी पहाटे गस्तीदरम्यान येथील पोलिसांनी ही कारवाई केली.
संदेश भिसे, अरविंद काते (मंडणगड) या दोघांना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एम.एच. 08/एच 1648 या मालवाहू ट्रकमधून अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक सुरू होती. हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना भरणे येथे गस्तीदरम्यान अडवत ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. ट्रकमध्ये लाखो रूपये किंमतीचा सोललेला खैराचा साठा आढळला असून याचा कुठलाही परवाना नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार पोलिसांनी ट्रकसह खैर लाकूड साठा जप्त केला. हा खैर लाकूड साठा नेमका कुठून आला व कुठे जात होता? याची येथील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ट्रकमध्ये नेमका किती रूपयांचा खैर लाकूड साठा होता, याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.