वृत्तसंस्था/ कोलकाता
आगामी आयपीएलसाठी भरत अरुण हे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आपल्या संघात दाखल होतील, अशी घोषणा कोलकाता नाईट रायडर्स प्रँचायझीने शुक्रवारी केली.
भरत अरुण यांनी भारताच्या राष्ट्रीय संघाचे 2014 पासून गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून संघाला नवी उंची गाठून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. क्रिकेटपटू असताना त्यांनी भारताचे कसोटी व वनडेत प्रतिनिधित्व केले होते तर देशी क्रिकेटमध्ये त्यांनी तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निवडीचे केकेआरचे प्रमुख प्रशिक्षक ब्रेन्डॉन मेकॉलम यांनी स्वागत केले असून त्यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आपल्या संघाला उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बी. अरुण यांनी तामिळनाडू संघापासून प्रशिक्षकाचा कार्यकाल सुरू केला. त्यानंतर बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ते प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक बनले. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले होते. त्या संघाचे बी. अरुण हे प्रमुख प्रशिक्षक होते.