मालवण येथे सुरेश प्रभू यांची माहिती
प्रतिनिधी / मालवण:
राजापूर लोकसभा मतदार संघातून एकदा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून एकदा अशा दोन टर्ममध्ये खासदार आणि केंद्रीयमंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी आपण भविष्यात कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
श्री. प्रभू हे दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आले होते. तर सध्या ते भाजपमध्ये दाखल झालेले असून भाजपकडून राज्यसभा सदस्य म्हणून त्यांना संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू मंत्रीमंडळात त्यांनी रेल्वे, हवाई उड्डाण, वाणिज्य अशा महत्वाच्या विभागांचा कारभार पाहिला होता. सध्या ते भारत सरकारचे शेर्फा म्हणून कार्यरत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात त्यांच्या मानव साधन विकास संस्था आणि जनशिक्षण संस्थेच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने श्री. प्रभू हे आगामी निवडणूक लढविणार असल्याचीही चर्चा काही ठिकाणी सुरू झाली होती. प्रभू यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात कार्यरत असल्याने त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा सुरू असते.
दरम्यान, आज स्वत: प्रभू यांनी आपण कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण वितरीत समाजकारण करण्याच्या सूचना दिल्याने जनशिक्षण संस्थेच्यामार्फत आपण समाजकार्यात सक्रियपणे सहभागी राहणार आहोत. युवकांनी नोकरीच्या पाठी न लागता स्वत:चा व्यवसाय अगर स्वत: नोकरी देणारे बनण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनेक पदाधिकाऱयांच्या भेटी
दरम्यान, खासदार सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानी गेले दोन दिवस विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देवून चर्चा केली आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही भेट घेतली होती. गणेशोत्सवासाठी आलेल्या सर्वांचे श्री. प्रभू यांनी स्वागत केले होते.