काँग्रेसची दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार : निवडणूक अधिकाऱयांनी कारवाई न केल्याची खंत
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीत पराभवाची जाणीव झाल्यामुळे भाजपकडून पोस्टल बॅलेट मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहे, असा दावा काँग्रेस पक्षाने केला असून त्यासंबंधी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात यापूर्वी राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. तरीही अद्याप कारवाई झालेली नाही, अशी खंत व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात, राज्यात अद्याप निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही सत्ताधारी भाजपचे काही उमेदवार पोस्टल मतदान करणाऱया सरकारी कर्मचाऱयांवर दबाव टाकत असून त्या बदल्यात मोठय़ा प्रमाणात पैसेही वाटत आहेत, असा दावा केला आहे.
राज्य सरकारची यंत्रणा आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱयांना धमकावण्याचे प्रकार सुरु केले आहेत. सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱयांवर दबाव आणला जात आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस वायरलेस सेवेचा गैरवापर
दरम्यान, पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱया पोलीस कर्मचाऱयांची यादी मिळविण्यासाठी भाजपने ‘पोलीस वायरलेस सेवे’चा वापर केल्याचा दावाही चोडणकर यांनी केला आहे. पणजी पोलीस मुख्यालयातून 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी सर्व पोलीस स्थानकांना वायरलेस संदेश प्रसारित करण्यात आला होता. त्यात बॅलेट पेपरसाठी किती पोलीस कर्मचाऱयांनी अर्ज केले आहेत? किती जणांनी मतदान केले? किती जण मतदान करणार आहेत? यासंबंधी माहिती मागविण्यात आली होती, असा दावा पत्रातून करण्यात आला आहे.
अशाप्रकारे भाजपकडून या मतदारांना आमिषे दाखविण्यात येत असल्याने निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व लोकशाहीची मूल्ये तुडविली जात आहेत. त्यामुळे तातडीने कारवाई करून ते पावित्र्य आणि मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नरत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या वायरलेस संदेश प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व त्यात गुंतलेल्या प्रत्येकावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
मतदानासाठी दबाव टाकणारे ऑडिओ पुरावे
दरम्यान, पोस्टल मतदान करणाऱया सरकारी कर्मचाऱयांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपचे काही उमेदवार पैशांची ऑफर देत असल्याचा ऑडिओ पुरावा काँग्रेसकडे उपलब्ध आहे. संकल्प आमोणकर यांनीही चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारची तक्रार स्थानिक निर्वाचन अधिकाऱयांकडे केली होती. त्याशिवाय माजी साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांनीही एका भाजप उमेदवाराचा एजंट निवडणूक डय़ुटीवरील कर्मचाऱयाला ‘त्या’ उमेदवारासाठी मतदान करण्यास सांगत असल्याचा ऑडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे.