ऑनलाईन टीम / भिवंडी :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता भिवंडी लोकसभेचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. कपिल पाटील यांच्या पत्नीला सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. त्यानंतर स्वतः कपिल पाटील यांना, त्यांचा मुलगा, सून आणि मुलीसोबत पुतण्या आणि दोन सूना अशा एकूण आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
दरम्यान, सर्वात आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, काँग्रेसचे अशोक चव्हाण तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. मात्र, काही नेत्यांनी या कोरोनामुळे आपले प्राणही गमवले आहेत.