ऑनलाईन टीम / लखनऊ :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मुलायमसिंह यादव यांच्या घरात फूट पाडत त्यांच्या सून अपर्णा यादव यांना भाजपात सामील करुन घेतले. अपर्णा यादव यांना लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली. मात्र, ऐनवेळी भाजपने अपर्णा यादव यांचे तिकीट कापले. भाजपच्या या डबलगेमचा अपर्णा यादव यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताना एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा असणाऱ्या अपर्णा यादव यांचे तिकीट कापून योगी सरकारचे कायदे मंत्री ब्रिजेश पाठक यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे प्रयागराजच्या भाजपा खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला देखील उमेदवारी नाकारण्यात आली आहे.