सदस्य निवडीसाठी पक्षीय पातळीवर खलबते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी पुढील आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीमध्ये देशाच्या विविध भागातील साधारण 120 सदस्य निवडले जातात. पक्षाला बळकटी देऊ शकणाऱया नेत्यांची कार्यकारिणीवर वर्णी लागते. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पक्षीय पातळीवर खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा सध्या दिल्ली दौऱयावर असून ते पक्षाध्यक्ष नड्डा यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
जे. पी. नड्डा यांनी जानेवारी 2020 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली होती. देशात भाजपप्रणित आघाडीची सत्ता असली तरी काही राज्यांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या अनुषंगाने आता नवी टीम तयार करण्यासाठी भाजप नेतृत्त्वाकडून प्रयत्न सुरू आहेत. नव्या कार्यकारिणीमध्ये अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस संपर्कात
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱयावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच शनिवारी ते पक्षाध्यक्ष नड्डा यांच्या संपर्कात होते. ते महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होऊ इच्छिणाऱया संभाव्य नेत्यांच्या नावांबाबत नड्डा यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचे चर्चेतील चेहरे
महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी अलिकडेच जाहीर झाली होती. या कार्यकारिणीमध्ये काही नेत्यांना संधी मिळाली नव्हती. सदर नेत्यांना आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सहभागी होण्याचे वेध लागले आहेत. त्यानुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचीही नावे चर्चेत असली तरी त्यांच्या सहभागासंबंधी काही जणांकडून शंकाही व्यक्त होत आहे. मात्र, पदाधिकाऱयांची नवे निवडताना सामाजिक समीकरणांची काळजी घेतली जाईल, असेही बोलले जात असून भाजपमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.