ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार निवासस्थानी ही घटना घडली आहे. राम स्वरूप शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कर्मचाऱ्यांने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
रामस्वरूप शर्मा हे भाजपचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेस उमेदवार आश्रय शर्मा यांना जवळपास ४ लाख मतांनी पराभूत केले होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचे निवासस्थान आहे. याच खासदार निवास्थानातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने आम्हाला या घटनेची फोन करून माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
रामस्वरूप शर्मा यांचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि हिमाचलचे सीएम जयराम ठाकुर यांच्यासोबत जवळचे संबंध होते. हिमाचलमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी रामस्वरूप शर्मा एक होते. शर्मा यांच्या निधनामुळे भाजपने आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या जोगिंदरनगरचे रहिवासी होते.