प्रस्तावास काँग्रेस खुले आव्हान : अगोदर शत्रू निश्चितीबाबत सुनावले खडे बोल काँग्रेस संपविण्यसाठी गोव्य़ात आल्याचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
भाजप विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा इरादा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी व्यक्त केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसने भाजपला हटविण्यासाठी आम्ही कोणत्याही त्यागास तयार आहोत, अशी घोषणा करून महाविकास आघाडीला पुरक असे वातावरण तयार केले. तथापि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तृणमूल काँग्रेसला आपण राजकीय शत्रू अगोदर निश्चित करा, त्यानंतरच बोलणी करायला पुढे या असे खुले आव्हान देऊन नियोजित आघाडीच्या प्रस्तावावरून तृणमूलला खडेबोल सुनावले.
महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात महाविकास आघाडी तयार करून भाजपला धूळ चारण्यासाठी गोवा फॉरवर्डचे नेते सरदेसाई यांनी आयपॅकचे नेते प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून विरोधकांची मते फुटली जाऊ नयेत या दृष्टीने तृणमूल काँग्रेसने आपल्या धोरणात थोडी शिथीलता ठेवावी या अनुषंगाने विचारविनिमय केला.
तृणमूल काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद
काल शुक्रवारी सायंकाळी तृणमूलच्या खासदार मोहुआ मोहीत्रा यांनी एक व्टिट करून भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही चार पावले पुढे जाऊन वाट्टेल तो त्याग करण्यास राजी असल्याचे मत व्यक्त केले. याचाच अर्थ तृणमूलने आपल्या धोरणात बदल केला असून त्या महाआगाडीस तयार आहेत.
नियोजित महाविकास आघाडीत चार पक्ष
प्राप्त माहितीनुसार संकल्पीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्षाचा समावेश असेल. या अनुषंगाने राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांदरम्यान बोलणी झाली आहे. या बोलणीबाबत दोन्ही पक्षांनी गुप्तता पाळलेली आहे.
चारही पक्षांना कराव्या लागणार तडजोडी
आघाडी केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना फार मोठा त्यागही करावा लागणार आहे. जागा वाटप करताना प्रत्येक राजकीय पक्षाला फार मोठी तडजोड करावी लागणार आहे. मगो आणि गोवा फॉरवर्ड यांनी तडजोड करण्यास मान्यता दिली आहे. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवर कोणता निर्णय घेतलेला आहे हे समजलेले नाही. परंतु राष्ट्रीय पातळीवरून काँग्रेसने सकारात्मक पवित्रा घेतलेला आहे.
आघाडी कोणाची? भाजप मित्र पक्षाकडे ?
तृणमूलने आपला राजकीय शत्रू निश्चित करावा : चोडणकर
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की प्रस्ताव चांगला आहे यात शंकाच नाही. परंतु केवळ तीन महिन्यांपूर्वी गोव्यात आलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला गोव्यात काँग्रेस संपवायचा इरादा आहे. आमचे आमदार उचलले, अनेक पदाधिकाऱयांना उचलले. भाजपच्या आमदारांना उचलत नाही व भाजपवर त्यांची टीकाही नसते. केवळ काँग्रेसलाच ते नेहमी टार्गेट बनवित असतात. त्यांना खरोखरच भाजपला मित्र मानायचे आहे. त्यामुळेच ते तीन महिन्यांपूर्वी गोव्यात आले व केवळ काँग्रेस पक्षावर ते हल्ला करीत आहेत. त्यांनी आपले उद्दीष्ट निश्चित करावे आणि आपला राजकीय शत्रू निश्चित करावा, त्यानंतरच महाआघाडीबाबत चर्चा करावी, असे म्हटले आहे.
महाआगाडीचे स्वागत आहे : सुदिन
मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी महाआघाडीच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. सोमवारपर्यंत याबाबत निर्णय होईल, असे ते म्हणाले.