कोरोना रूग्णांसाठी दीनदयाळ योजना रद्द : काँग्रेस पक्षाची जोरदार टीका
प्रतिनिधी / मडगाव
कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी दीनदयाळ स्वास्थ योजने (डीडीएसव्हाय योजना) खाली आणण्याचा सरकारी निर्णय भाजप सरकारने रद्द म्हणजे भाजप सरकारचे केवळ श्रीमंतांकडे लक्ष देण्याचे व गरीबांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या बेकारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे अशी खरमरीत टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
सरकारने त्वरित सामान्य लोकांच्या कोरोना उपचारासाठी योजना जाहीर करावी तसेच खासगी इस्पितळात आकारण्यात येणारे उपचारांचे दर कमी करावेत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
‘आजाराचा बाजार करणाऱया’ भाजप सरकारने आज सामान्य माणसाला आर्थिक बोज्याखाली चिरडले असून, आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करण्यास सरकारला आलेल्या अपयशाने आज गरीब कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. दीनदयाळ स्वास्थ योजना अचानक रद्द करण्याचा सरकारच्या निर्णयांने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मधला वाद परत एकदा उघड झाला आहे असा दावा चोडणकर यांनी केला.
गोमंतकीय जनतेला परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे व कोविड पासून दूर ठेवावे अशी आम्ही प्रार्थना करतो असे श्री. चोडणकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये खासगी इस्पितळांकडून येणारे कमिशन वाटून घेण्याच्या मुद्दावर वाद उफाळून आल्यानेच सरकारने ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह मंत्री मंडळातील सर्व मंत्री व भाजपचे पदाधिकारी कोरोना महामारी काळात केवळ सरकारी तिजोरी लुटण्यात व्यस्त आहेत हा काँग्रेस पक्षाचा आरोप आजच्या निर्णयाने परत एकदा खरा ठरला आहे. भाजप सरकारला लोकांच्या आरोग्याचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट झाल्याचे श्री. चोडणकर यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीचे गोव्यात रुग्ण सापडल्यानंतर चाचणी केंद्र सुरू करणे, वैद्यकीय उपकरणे व व्हेंटीलेटर खरेदी या सर्वांसाठी मागील सात महिन्यात जो विलंब झाला तो मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन वाटून घेण्यात एकमत नसल्यामुळेच हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.