एशियन डेव्हलपमेंट बँकेची माहिती -व्यापक लसीकरणाचा अर्थव्यवस्थेला लाभ होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या देशामध्ये कोरोनाची दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. याचदरम्यान एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) यांनी देशाची अर्थव्यवस्था लवकरच सकारात्मक बातमी देणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. यामध्ये एडीबीने म्हटले आहे, की देशामध्ये सध्या व्यापक स्वरुपातील लसीकरणाची मोहीम सुरु आहे. याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होणार असून यामध्ये देशाची अर्थव्यवस्था 11 टक्के दराने मजबूत राहणार असल्याचीही माहिती एडीबीने दिली आहे.
लसीकरणाचा लाभ शक्य
एडीबीने आपल्या प्रमुख आशियाई विकास आउटलूक (एडीओ) 2021 चे सादरीकरण केले आहे. यामध्ये देशातील मजबूत लसीकरण मोहीमेसह भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2021 मध्ये 11 टक्क्यांनी वाढणार असून आर्थिक वर्ष 2022 मध्येही देशाची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वधारणार असल्याचे भाकीत एडीबीने केले आहे.
आशियातील अर्थव्यवस्था मजबूत राहणार
एडीबीने स्पष्ट केल्याप्रमाणे चालू आर्थिक वर्षात विकसनशील आशियाचा आर्थिक वृद्धीदर हा 7.3 टक्क्यांच्या जवळपास राहणार आहे. मागील वर्षात हा दर 0.2 टक्के राहिला होता. कोरोनाच्या महामारीच्या संकटात जागतिक पातळीवरील स्थिती पूर्वपदावर येत असून यामध्ये लसीकरण मोहीमेसह अन्य बाबीचा लाभ होणार असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे एडीबीने नमूद केले आहे.