आयसीसी यू-19 क्रिकेट विश्वचषक : दुसऱया उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा, शतकवीर यश धुल-अर्धशतकवीर रशीदची द्विशतकी भागीदारी निर्णायक
वृत्तसंस्था /ऑस्बर्न
युवा कर्णधार यश धुलचे सनसनाटी शतक, शेख रशीदचे अर्धशतक आणि गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या बळावर भारताच्या यू-19 संघाने ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी फडशा पाडत 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. भारताने निर्धारित 50 षटकात 5 बाद 290 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन युवा संघाला 41.5 षटकात सर्वबाद 194 धावांवरच समाधान मानावे लागले. सामनावीर यश धुलने नेतृत्वाला साजेसे शतक झळकावताना 110 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह 110 तर शेख रशीदने 108 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 94 धावांची झंझावाती खेळी साकारली.
शतकवीर यश धुल व अर्धशतकवीर रशीद यांनी तिसऱया गडय़ासाठी 204 धावांची धडाकेबाज, द्विशतकी भागीदारी साकारली, ते या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा साकारत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर सातत्याने दडपण राखले. ऑस्ट्रेलियातर्फे लॅचलन शॉने 51 धावा फटकावल्या. मात्र, तोवर हा सामना ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटला होता.
जलद गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर (0-26) व रवी कुमार (2-37) यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सातत्याने दडपणाखाली ठेवले तर मधल्या षटकात फिरकीपटू निशांत सिंधू (2-25), विकी ओस्तवाल (3-42), कौशल तांबे (1-32) यांनी अतिशय लक्षवेधी मारा साकारला.
त्यापूर्वी, धुल व रशीद यांची धडाकेबाज फलंदाजी निर्णायक ठरली. आजवर विक्रमी चारवेळा चॅम्पियन्स ठरलेल्या भारताची यंदाच्या जेतेपदासाठी उद्या (शनिवार दि. 5) निर्णायक फायनल रंगणार आहे. अंतिम फेरीत इंग्लंड हा भारताचा प्रतिस्पर्धी असेल.
यश धुल हा या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी विराट कोहली (2008) व उन्मुक्त चंद (2012) हे शतक झळकावणारे भारतीय कर्णधार देखील दिल्लीचेच होते. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी असणाऱया भारताला यंदा पहिल्याच टप्प्यात कोव्हिड-19 चा फटका बसल्याने मोठा धक्का सोसावा लागला होता. धुल व रशीदसारखे दोन अव्वल फलंदाज 2 सामन्यात खेळू शकले नव्हते. पण, यानंतरही मधल्या फळीतील दर्जेदार फलंदाजांनी या उभयतांची अजिबात उणीव जाणवू न देता संघाला बाद फेरीत पोहोचवले आणि त्यानंतर धुल व रशीद यांनी संघातील आपले पुनरागमन तडफदार खेळींनी साजरे केले.
गुरुवारी उशिरा खेळवल्या गेलेल्या दुसऱया उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचा बहरातील सलामीवीर विली अतिशय स्वस्तात बाद झाला. डावखुरा जलद गोलंदाज रवी कुमारच्या एका अप्रतिम इनस्विंगरवर विलीला पायचीत देण्यात आले. कॅम्पबेल केलॅवे (30) व कॉरे मिलर (38) यांनी दुसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, अवघ्या 6 चेंडूंच्या अंतरात हे दोन्ही फलंदाज बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 3 बाद 73 असा गडगडला.
डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालने सॅल्झमनचा परतीचा झेल टिपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 30 षटकात 6 बाद 119 अशी आणखी पडझड झाली आणि यावेळी भारताचा विजय जवळपास सुनिश्चित झाला होता. यश धुलने या लढतीत फलंदाजीत वरचष्मा गाजवलाच. शिवाय, नेतृत्वातही त्याने उत्तम चमक दाखवली. त्याने डावखुऱया फिरकीपटूंऐवजी पार्टटाईम ऑफस्पिनर रघुवंशीला पाचारण करण्याची पेलेली चाल याचे उत्तम उदाहरण होते. रघुवंशीने मिलरला बाद करत लक्षवेधी ब्रेकथू मिळवून दिला.
भारताची उत्तम फलंदाजी
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीला फारसे पोषक वातावरण नसेल, याची कल्पना असतानाही अधिक धावा फलकावर लावून प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणण्याची रणनीती अवलंबली आणि हा गेमप्लॅन चांगलाच यशस्वी झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. अंगकृश रघुवंशी (30 चेंडूत 6) व हरनूर सिंग (30 चेंडूत 16) यांनी सावध पवित्र्यावर भर दिल्याने भारताच्या धावगतीवर याचा विपरीत परिणाम झाला.
विल्यम सॅल्झमनने एका अप्रतिम चेंडूवर रघुवंशीचा ऑफस्टम्प उद्ध्वस्त करत संघाला पहिला धक्का दिला. हरनूरने स्नेलच्या लेगस्टम्पवरील उसळत्या चेंडूवर पूलचा अति साहसी फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीमागे झेल दिला. भारताची यामुळे 13 षटकात 2 बाद 37 अशी स्थिती होती. याचवेळी धुल व रशीद यांनी संघाला सुस्थितीत आणण्यात अजिबात कसर सोडली नाही.
या स्पर्धेतील केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या या युवा फलंदाजांनी सर्वस्व पणाला लावत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. धुलने स्क्वेअर आणि स्क्वेअरच्या मागील बाजूने अधिक धावा जमवल्या. फिरकीपटूंना सामोरे जाताना त्याचे लेटकटचे फटके देखील तितकेच लाजवाब होते. एरियल स्ट्रेट ड्राईव्हवर पहिला चौकार फटकावणाऱया रशीदच्या खेळीत 8 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
पुढे, धुल बाद झाल्यानंतर रशीद देखील निस्बेटच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटकडे झेल देत तंबूत परतला. दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यानंतर भारताची धावगती किंचीत कमी झाली. मात्र, अंतिम टप्प्यात निशांत सिंधू (10 चेंडूत नाबाद 12), दिनेश बाणा (4 चेंडूत नाबाद 20), राजवर्धन हंगरगेकर (10 चेंडूत 13) यांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला 300 धावांच्या उंबरठय़ावर नेले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय युवा संघ : 50 षटकात 5 बाद 290 (यश धुल 110 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह 110, शेख रशीद 108 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 94, दिनेश बाणा 4 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 20. अवांतर 19. जॅक निस्बेट 9 षटकात 2-41, विल्यम सॅल्झमन 10 षटकात 2-57).
ऑस्ट्रेलियन युवा संघ : 41.5 षटकात सर्वबाद 194 (लॅचलन शॉ 66 चेंडूत 4 चौकारांसह 51, कॉरे मिलर 46 चेंडूत 6 चौकारांसह 38, कॅम्पबेल केलॅवे 53 चेंडूत 1 चौकारासह 30, जॅक सिनफिल्ड 14 चेंडूत 20, टॉम व्हिटनी 17 चेंडूत 2 षटकारांसह 19. अवांतर 10. विकी ओस्तवाल 10 षटकात 3-42, रवी कुमार 6 षटकात 2-37, निशांत सिंधू 6 षटकात 2-25, कौशल तांबे 1-32, अंगकृश रघुवंशी 1-11).
स्पर्धेतील तिसरा शतकवीर ठरण्याचा अभिमान ः यश धुल
यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा केवळ तिसरा भारतीय ठरण्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन कर्णधार यश धुलने केले. यश धुलपूर्वी विराट कोहली व उन्मुक्त चंद यांनाच या स्पर्धेच्या इतिहासात शतके झळकावता आली आहेत.
‘डावाच्या अखेरपर्यंत मी व रशीदने फलंदाजी करत राहणे हा आमचा प्लॅन होता. साहसी फटके टाळणे आणि स्ट्राईक रोटेट ठेवणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. 40 व्या षटकानंतर आक्रमणावर भर देण्यात काहीच गैर नव्हते. आमची उभयतांची भागीदारी निर्णायक ठरली. रशीद मनाने खंबीर आहे आणि मोठी खेळी साकारण्यासाठी तो महत्त्वाकांक्षी असतो, याचा लाभ झाला’, असे निरीक्षण यश धुलने नोंदवले.
ऑस्ट्रेलियाचे खराब क्षेत्ररक्षण भारताच्या पथ्यावर
ऑस्ट्रेलियाचे खराब क्षेत्ररक्षण, ही बाबही भारताच्या पथ्यावर पडली. त्यांनी रशीदला 24 धावांवर जीवदान दिले. याशिवाय, धुलला 74 धावांवर असताना धावचीत करण्याची सोपी संधी दवडली होती.
शेवटच्या 10 षटकात भारताची 108 धावांची आतषबाजी
भारतीय संघाने या सामन्यातील शेवटच्या 10 षटकात तब्बल 108 धावांची आतषबाजी केली आणि तोच जणू या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. डावातील शेवटच्या टॉम व्हीटनीच्या षटकात तर भारताने तब्बल 27 धावा वसूल केल्या.
षटकनिहाय धावसंख्या
- संघ 15 षटके 30 षटके 40 षटके 50 षटके
- भारत 2-46 2-114 2-182 5-290
- ऑस्ट्रेलिया 1-65 6-119 9-180 10-194 (41.5)