आयसीसी टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडनेही अक्षरशः लोळवले! सलग दुसऱया पराभवामुळे भारत ‘एक्झिट’च्या दारात!
शारजाह / वृत्तसंस्था
आपल्या मेगास्टार क्रिकेटपटूंनी मेगा फ्लॉप खेळासह सपशेल लोटांगण घातल्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ अक्षरशः ‘एक्झिट’च्या दारात फेकला गेला आहे. सर्व आघाडय़ांवर भारतापेक्षा कित्येक कोस सरस प्रदर्शन साकारणाऱया न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून फडशा पाडला आणि मावळता कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाकिस्तानविरुद्ध पराभवामुळे झालेली भळभळती जखम अद्याप ताजी असताना न्यूझीलंडने या निकालासह त्यावर जणू आणखी मीठ चोळले आहे.
रविवारी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरावे लागलेल्या भारताला 20 षटकात 7 बाद 110 धावांवर समाधान मानावे लागले आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.3 षटकात 2 बाद 111 धावांसह अगदीच एकतर्फी विजय नोंदवला.
पाकिस्तानविरुद्धचा पराभव ज्याप्रमाणे लाजीरवाणा होता, त्याचप्रमाणे न्यूझीलंडचाविरुद्धचा येथील पराभवही भारतासाठी नामुष्कीजनक ठरला. भारताचे 111 धावांचे आव्हान डॅरेल मिशेल (35 चेंडूत 49) व कर्णधार केन विल्यम्सन (31 चेंडूत नाबाद 33) यांच्या फटकेबाजीमुळे केवळ 14.3 षटकातच पार केले गेले.
पाकिस्तानविरुद्ध लढतीप्रमाणेच येथेही डावखुऱया-संथगती गोलंदाजांचा बोलबाला ठरला. डावखुरा ऑर्थोडॉक्स मिशेल सॅन्टनर (4-0-15-0) व सामनावीर लेगस्पिनर ईश सोधी (4-0-17-2) यांनी काटेकोर मारा करत 8 षटकात केवळ 32 धावा दिल्या. भारताने या लढतीत केएल राहुल-रोहितऐवजी केएल राहुल-इशान किशन यांना सलामीला उतरवले. पण, ही चाल भारतावरच उलटल्याचे स्पष्ट झाले.
भारताने या लढतीसाठी 2 बदल करत सुर्यकुमार यादवऐवजी इशान किशनला तर भुवनेश्वर कुमारऐवजी शार्दुल ठाकुरला खेळवले. सुर्यकुमार यादव पाठदुखीने त्रस्त असल्याने त्याला विश्रांती दिल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. न्यूझीलंडने एक बदल करताना टीम सेफर्टऐवजी ऍडम मिल्नेला खेळवले होते.
धावफलक
भारत ः केएल राहुल झे. मिशेल, गो. साऊदी 18 (16 चेंडूत 3 चौकार), इशान किशन झे. मिशेल, गो. बोल्ट 4 (8 चेंडूत 1 चौकार), रोहित शर्मा झे. गप्टील, गो. सोधी 14 (14 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), विराट कोहली झे. बोल्ट, गो. सोधी 9 (17 चेंडू), रिषभ पंत त्रि. गो. मिल्ने 12 (19 चेंडू), हार्दिक पंडय़ा झे. गप्टील, गो. बोल्ट 23 (24 चेंडूत 1 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 26 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शार्दुल ठाकुर झे. गप्टील, गो. बोल्ट 0 (3 चेंडू), मोहम्मद शमी नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 4. एकूण 20 षटकात 7 बाद 110.
गडी बाद होण्याचा क्रम
1-11 (इशान, 2.5), 2-35 (केएल राहुल, 5.5), 3-40 (रोहित, 7.4), 4-48 (विराट, 10.1), 5-70 (रिषभ पंत, 14.3), 6-94 (हार्दिक, 18.1), 7-94 (शार्दुल, 18.4).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-20-3, टीम साऊदी 4-0-26-1, मिशेल सॅन्टनर 4-0-15-0, ऍडम मिल्ने 4-0-30-1, ईश सोधी 4-0-17-2.
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टील झे. शार्दुल, गो. बुमराह 20 (17 चेंडूत 3 चौकार), डॅरेल मिशेल झे. राहुल, गो. बुमराह 49 (35 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 33 (31 चेंडूत 3 चौकारांसह 33), डेव्हॉन कॉनव्हे नाबाद 2 (4 चेंडू). अवांतर 7. एकूण 14.3 षटकात 2 बाद 111.
गडी बाद होण्याचा क्रम
1-24 (गप्टील, 3.4), 2-96 (डॅरेल मिशेल, 12.4).
गोलंदाजी
वरुण चक्रवर्ती 4-0-23-0, जसप्रित बुमराह 4-0-19-2, रविंद्र जडेजा 2-0-23-0, मोहम्मद शमी 1-0-11-0, शार्दुल ठाकुर 1.3-0-17-0, हार्दिक पंडय़ा 2-0-17-0.
पुन्हा एकदा ‘ब्लॅक संडे’, पुन्हा एकदा ‘ब्लँक रिझल्ट‘!
एकीकडे, एकेक संघांचे तीन-तीन सामने झाले असताना भारताने रविवारी आपला केवळ दुसराच सामना खेळला, तो ही अगदी एका आठवडय़ाच्या अंतराने! पण, इतकी विश्रांती मिळूनही भारताच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली. मागील रविवारी पाकिस्तानविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पचवणाऱया भारतीय संघाला या रविवारी न्यूझीलंडविरुद्ध देखील चारीमुंडय़ा चीत व्हावे लागले! भारतीय चाहत्यांची यामुळे ‘पुन्हा एकदा ब्लॅक संडे, पुन्हा एकदा ब्लँक रिझल्ट’ अशी अवस्था झाली.
पुन्हा तेच….नाणेफेकीपाठोपाठ सामन्यातही घात!
या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध लढतीप्रमाणेच येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील भारतीय कर्णधार विराट कोहली नाणेफेकीचा कौल जिंकू शकला नाही. स्पर्धेत नाणेफेक जिंकणारे संघच अधिक सामने जिंकत आले असून तीच मालिका भारताच्या या दोन लढतीत देखील कायम राहिली. साहजिकच, प्रथम नाणेफेकीत आणि नंतर निकालातही भारताच्या पदरी निराशाच आली.
असा चमत्कार घडला तरच भारत उपांत्य फेरीत!
पहिले दोन्ही सामने गमावल्याने गुणतालिकेत भारताची पाटी अद्याप कोरी राहिली असून भारतीय संघ एव्हाना स्पर्धेतून एक्झिटच्या दारात फेकला गेला आहे. या परिस्थितीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमवले तरच भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशाअपेक्षा बाळगता येईल. अर्थात, ही अपेक्षा देखील भारताने अफगाणिस्तान, नामिबिया व स्कॉटलंड यांच्याविरुद्ध विजय मिळवला तरच बाळगता येईल! अफगाण-न्यूझीलंड यांच्यातील लढत दि. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
8 ते 15 षटकादरम्यान एकही चौकार नाही!
भारतीय संघाने या लढतीत तब्बल 54 चेंडू निर्धाव खेळून काढले. याचाच अर्थ असा की, 20 पैकी 9 षटकात भारताने एकही धाव घेतली नाही. एकदा तर 8 व्या ते 15 व्या षटकादरम्यान किवीज फिरकीपटू गोलंदाजी करत असताना भारताला अगदी एकही चौकार फटकावता आला नव्हता.
भारताचे स्पर्धेतील उर्वरित सामने
तारीख / सामना / वेळ / सामन्याचे ठिकाण
3 नोव्हेंबर / भारत वि. अफगाण / सायं. 7.30 वा.
5 नोव्हेंबर / भारत वि. स्कॉटलंड / सायं. 7.30 वा.
8 नोव्हेंबर / भारत वि. नामिबिया / सायं. 7.30 वा.