अफगाणने न्यूझीलंडला नमवले तरच भारताला आशाअपेक्षा, अन्यथा स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याचा धोका
अबु धाबी / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राहण्यासाठी आज (रविवार दि. 7) अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमवणे आवश्यक असून साहजिकच, भारताच्या सर्व नजरा आज याच लढतीकडे असणार आहेत. अफगाणने हा सामना जिंकला तरच भारताला उपांत्य फेरीत पात्रतेची आशाअपेक्षा करता येईल. उलटपक्षी, न्यूझीलंडने अफगाणला हरवले तर मात्र भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. उभय संघातील ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
गुणतालिकेत सध्या न्यूझीलंडच्या खात्यावर 6 गुण तर भारताच्या खात्यावर 4 गुण आहेत. न्यूझीलंडचा संघ विजयी ठरला तर ते 8 गुणांवर पोहोचतील व भारताला शेवटचा सामना जिंकला तरी 6 गुणांवरच समाधान मानावे लागेल. अशा परिस्थितीत दुसऱया गटातून पाकिस्तान व न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर भारत-नामिबिया यांच्यात उद्या होणारी लढत औपचारिक असेल.
दुसरीकडे, अफगाणने न्यूझीलंडला नमवले तर न्यूझीलंड 6 गुणांवरच राहील, अफगाण 6 गुणांवर येईल आणि नामिबियाविरुद्ध शेवटची लढत हाताशी असल्याने भारताकडे उपांत्य फेरीसाठी पूर्ण जोमाने प्रयत्न करण्याची संधी असेल. या अनुषंगाने अफगाण-न्यूझीलंड लढत महत्त्वाची असणार आहे.
न्यूझीलंडने यापूर्वी शुक्रवारी नामिबियाविरुद्ध सहज विजय संपादन केला होता. तीच मालिका येथेही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फक्त अफगाण काही चमत्कार घडवू शकणार का, याचीच येथे उत्सुकता असणार आहे. जिम्मी नीशम व ग्लेन फिलीप्स यांनी आघाडी लाईनअप अपयशी ठरल्यानंतर उत्तम फटकेबाजी केली होती. न्यूझीलंडने मोठी धावसंख्या रचल्यानंतर नामिबियाचा संघ सपशेल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्ट, साऊदी, मिल्ने, फिरकीपटू सोधी व मिशेल सॅन्टनर यांच्यासमोर त्यांचा तग लागणे अर्थातच कठीण होते.
अफगाणचे फलंदाज विस्फोटक फलंदाजी करु शकतात, त्याचप्रमाणे त्यांचे गोलंदाज देखील भेदक मारा करु शकतात. मुजीब रहमान दुखापतीमुळे संघाबाहेर फेकला गेल्याने अफगाणची गोलंदाजी जरुर काहीशी दुबळी झाली आहे. पण, नबी व रशिद खान अव्वल दर्जाचा मारा करु शकत असल्याने या सामन्यात काहीही होऊ शकते. न्यूझीलंडसाठी मार्टिन गप्टील, डॅरेल मिशेल, केन विल्यम्सन यांचे योगदान विशेष महत्त्वाचे असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
अफगाणिस्तान ः मोहम्मद नबी (कर्णधार), हझरतुल्लाह, अहमद शहझाद, गुलाबदिन नईब, नवीन हक, रशिद खान, हमिद हसन, रहमनुल्लाह गुरबाझ, नजिबुल्लाह झॅद्रन, करीम जनत, मुजीब रहमान, हसमतुल्लाह शाहिदी, फरीद अहमद, उस्मान घानी.
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टील, डॅरेल मिशेल, डेव्हॉन कॉनव्हे, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मार्क चॅपमन, ऍडम मिल्ने, काईल जेमिसन, टॉड ऍस्ले.
सामन्याची वेळ- दुपारी 3.30 वा.
अबु धाबीतील लढतीवर भारताचे दुबईतून लक्ष!
न्यूझीलंड-अफगाण यांच्यातील आजची लढत अबु धाबीत होत असून भारतीय संघ सध्या दुबईत आहे. अर्थात संघ दुबईत असला तरी त्यांचे पूर्ण लक्ष मात्र अबु धाबीत होणाऱया लढतीवरच केंद्रित असणार आहे.