पवित्र गुरुद्वारामध्ये पुन्हा फडकविला निशान साहिब
वृत्तसंस्था / काबूल
भारत तसेच जगभरातून विरोध झाल्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पकतिया प्रांतात पवित्र गुरुद्वारा थाल साहिबच्या छतावर धार्मिक ध्वज निशान साहिब फडकविला आहे. हा गुरुद्वारा शिखांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री गुरुनानक देव यांनी येथे भेट दिली होती. तर यापूर्वी तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहिन यांनी निशान साहिब हटविला नसल्याचा दावा केला होता. पण या घटनेची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर तालिबानचा खोटारडेपणा उघड झाला होता.
चहुबाजूने टीकेचा भडिमार झाल्यावर तालिबानने आता निशान साहिब पुन्हा फडकविला आहे. तालिबानने धार्मिक ध्वज हटविल्यावर जगभरातील शिखांमध्ये प्रचंड संताप दिसून आला होता. तर गुरुद्वारामधून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये निशान साहिब हटविण्यात आल्याचे दिसून आले होते. अन्य धर्मांचा अपमान करण्याचा आरोप तालिबानवर होत आहे.
अफगाणिस्तानच्या युद्धग्रस्त भागांमध्ये दशकांपासून अल्पसंख्याक शीख तसेच हिंदूंवरील अत्याचार सुरू आहेत. विशेषकरून पकतिया हा भाग 1980 च्या दशकापासून तालिबान/हक्कानी गटाचा बालेकिल्ला होता. अफगाणिस्तान सरकारचा येथे कुठलाच हस्तक्षेप चालत नव्हता.
मागील वर्षी याच भागातून निदान सिंग सचदेव यांचे अपहरण करण्यात आले होते. ते श्रावण मासापूर्वी सेवेसाठी गुरुद्वाऱयात पोहोचले होते. दहशतवाद्यांनी त्यांची काही काळानंतर सुटका केली होती. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतल्यापासून तालिबानचा हिंसाचार वाढला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी पकतियामध्ये सरकारी सलाम टेलिकम्युनिकेशन नेटवर्कचे 11 टॉवर जमीनदोस्त केले आहेत. तेथे बसविण्यात आलेली तांत्रिक उपकरणे तालिबानने ताब्यात घेतली आहेत.