ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार अवि बरोटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
अवि बरोट हा अष्टपैलू खेळाडू सौराष्ट्रासाठी खेळत होता. उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याला ऑफ बॅक गोलंदाजी कशी करायची हेही माहीत होतं. आपल्या छोटय़ा क्रिकेट कारकिर्दीत अवीने प्रथम श्रेणीचे 38 सामने, 38 लिस्ट ए सामने आणि 20 देशांतर्गत टी-20 सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1547 धावा आहेत, ज्यात एक शतक आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये अवीने एकूण 8 अर्धशतकांच्या मदतीने 1030 धावा केल्या. टी-20 मध्ये त्याच्या नावावर दीड शतक आणि पाच अर्धशतके आहेत. अवीने या फॉरमॅटमध्ये एकूण 717 धावा केल्या.
यावषी 15 जानेवारीला गोव्याविरुद्ध सय्यद मुश्ताक अली करंडकात खेळताना अवीने टी-20 मध्ये शानदार शतक झळकावले. त्याने केवळ 53 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीसह संघाने 215 धावा केल्या. गोव्याला केवळ 125 धावा करता आल्या आणि सौराष्ट्राने हा सामना 90 धावांनी जिंकला होता. 2019-20 मध्ये रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा भाग होता.