वृत्तसंस्था/ लखनौ
टी-20 महिलांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱया भारताच्या 17 वर्षीय शेफाली वर्माची तुफानी फलंदाजी व डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाडची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघावर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला. मात्र द.आफ्रिकेने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तीन बळी मिळविणाऱया राजेश्वरी गायकवाडला सामनावीर पुरस्कार मिळाला.
गायकवाडने केवळ 9 धावांत 3 बळी मिळविल्याने प्रथम खेळणाऱया दक्षिण आफ्रिका संघाला 20 षटकांत 7 बाद 112 धावांवर रोखण्यात भारताला यश आले. त्यानंतर शेफाली वर्मा (30 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 60) व कर्णधार स्मृती मानधना (28 चेंडूत नाबाद 48) यांनी 96 धावांची सलामी दिल्याने 9 षटके बाकी असतानाच भारताने विजय साकार केला. शेफालीने शबनिम इस्लाईलने टाकलेल्या पहिल्याच षटकात 3 चौकार, 1 षटकारासह 18 धावा फटकावल्या. पुढच्या तीन षटकांतही तिने आणखी तीन षटकार मारले. तिने द.आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. पण नवव्या षटकात तिची खेळी संपुष्टात आली. मानधनाने आपल्या खेळीत 9 चौकार मारले. द.आफ्रिकेच्या डावात सूने लुसने सर्वाधिक 28, लारा गुडॉलने 25 धावा केल्या. लिझेली ली या डावात शून्यावर बाद झाली. भारताच्या अरुंधती रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा, सिमरन बहादूर यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका महिला 20 षटकांत 7 बाद 112 (लुस 28, गुडॉल 25, गायकवाड 3-9, रेड्डी 1-18), भारतीय महिला संघ 11 षटकांत 1 बाद 114 (शेफाली वर्मा 30 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 60), स्मृती मानधना 28 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 48), हरलीन देओल नाबाद 4, एन. शानगेज 1-18.