ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
झाइडस कॅडिला (Zydus Cadila) या फार्मा कंपनीने अमेरिकेतील गिलियड सायन्सेसच्या ‘रेमेडिसिवीर’ या अँटीवायरल औषधाचे स्वस्त जेनेरिक व्हर्जन बाजारात आणले आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या जेनेरिक औषधाच्या 100 mg कुपीची किंमत 2800 रुपये ठेवण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांना हे औषध ‘रेमडॅक’ नावाने विकले जाईल.अलीकडेच रेमेडिसिवीर हे औषध कोरोनावर प्रभावी उपचार नसल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. मात्र, कोरोनावर प्रभावी ठरणारे दुसरे कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर कोरोना रुग्णांना हेच औषध देत आहेत. त्यामुळे बाजारात त्याची मागणी वाढत आहे.
गिलियड सायन्सेसने रेमेडिसिवीर हे औषध इबोलाच्या उपचारासाठी तयार केले होते. कोरोना उपचारात या औषधाची मदत होत आहे. त्यामुळे भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स आणि मायलोन यांना हे औषध भारतात तयार करण्याची परवानगी मिळाली आहे.