कोरोना व्हेरियंटला नवे नाव : डब्ल्यूएचओने उचलले पाऊल
जीनिव्हा / वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ऑफ कंसर्न (व्हीओसी) व्हेरियंट ऑफ इंटरेस्टचे (व्हीओआय) नाव ग्रीक अल्फाबेट्सचा वापर करत ठेवण्याची घोषणा केली आहे. यांतर्गत सर्वप्रथम भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटला ‘डेल्टा’ म्हटले जाणार आहे. तर त्यापूर्वी मिळालेल्या व्हर्जनला कप्पा संबोधिण्यात येईल.
या प्रकारामुळे वैज्ञानिक नावांवर कुठलाच प्रभाव पडणार नाही. महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळाल्यावर संशोधनात त्याचा वापर सुरूच राहणार आहे. कुठल्याही देशाला कोरोनाचा व्हेरियंट शोधणे किंवा त्याची माहिती देण्याची शिक्षा मिळू नये असे उद्गार डब्ल्यूएचओच्या कोविड-19 विषयक तांत्रिक प्रमुख डॉ. मारिया वेन करखोवे यांनी काढले आहेत.
भारत सरकारचा होता आक्षेप
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला भारतीय संबोधल्याप्रकरणी सरकारने आक्षेप नोंदविला होता. बी.1.617 व्हेरियंटला जगासाठी चिंताजनक ठरविणाऱया जागतिक आरोग्य संघटनेच्या विधानाला अनेक प्रसारमाध्यमांनी स्थान दिले होते. यातील काही वृत्तांमध्ये या व्हेरियंटला भारतीय संबोधिण्यात आले होते. डब्ल्यूएचओने स्वतःच्या 32 पानी दस्तऐवजात बी.1.617 व्हेरियंटसोबत कुठेच भारतीय शब्द जोडला नसल्याचा दावा सरकारने केला होता.
डब्ल्यूएचओकडून पुष्टी
विषाणू किंवा व्हेरियंट्सला कुठल्याही देशाच्या नावाशी जोडत नाही. विषाणूला त्याच्या वैज्ञानिक नावानेच ओळखले जाते आणि सर्वांनी असेच करावे असे डब्ल्यूएचओच्या दक्षिणपूर्व आशिया कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. तत्पूर्वी डब्ल्यूएचओने कोरोनाच्या दुसऱया लाटेत भारतात फैलावणाऱया बी.1.617 स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक घोषित केले होते. हा व्हेरियंट अधिक संक्रमक वाटत असून तो सहजपणे फैलावू शकतो असे म्हटले होते. कमी नमुन्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगशाळेतील अध्ययनात या व्हेरियंटवर अँटीबॉडीजचा कमी प्रभाव होत असल्याचे दिसून आले आहे. पण या व्हेरियंटमध्ये लसीबद्दल अधिक प्रतिरोधक क्षमता आहे असा याचा अर्थ होत नाही असे केरखोव्ह यांनी सांगितले होते.
संक्रमण वाढण्यामागे हाच स्ट्रेन
बी.1.617 व्हेरियंटला डबल म्युटेंट स्ट्रेनही म्हटले जाते. हा स्ट्रेन महाराष्ट्र आणि दिल्लीत मोठय़ा प्रमाणात सापडला आहे. यामुळे तेथे महामारीच्या दुसऱया लाटेने मोठे नुकसान घडविले आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य असलेल्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले असता निम्म्याहून अधिक नमुन्यांमध्ये बी.1.617 व्हेरियंट आढळला आहे.