नेपाळचे नवे पंतप्रधान देऊबा यांचे आश्वासन
@ काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान शेर बहादुर देऊबा यांनी रविवारी संसदेत सहजगत्या बहुमत सिद्ध केल्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. त्यांच्या अभिनंदनाचा संदेशही पाठविण्यात आला. दोन्ही नेत्यांनी कोरोना आणि इतर मुद्दय़ांवर एकमेकांशी दृढ सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.
भारत आणि नेपाळचे हजारो वर्षांपासूनचे जवळीकीचे संबंध आहेत. दोन्ही देश सर्व क्ष्sात्रांमध्ये सहकार्य करण्यास सज्ज आहेत. फोनवरील चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून या चर्चेची माहिती दिली. देऊबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली होती. त्यांनी बहुमत सिद्ध केल्याने तेथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आल्याचे चित्र आहे.