वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई
आयसीसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकचा 107 धावांनी दणदणीत पराभव करत शानदार विजयी सलामी दिली. अर्धशतकी खेळी करणाऱया पूजा वस्त्रकारला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
या सलामीच्या सामन्याकडे क्रिकेट शौकिनांचे अधिक लक्ष लागले होते. भारत-पाक यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची अपेक्षित असते पण यावेळी हा सामना एकतर्फीच झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 244 धावा जमवित पाकला 245 धावांचे आव्हान दिले पण भारताच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकचा डाव 43 षटकांत 137 धावांत आटोपला. 50 षटकांच्या प्रकारात पाक महिला संघाचा हा भारताविरूद्धचा सलग 11 वा पराभव आहे.
भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. तिसऱयाच षटकांत डायना बेगने सलामीच्या शफाली वर्माचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 92 धावांची भागिदारी करीत डाव सावरला. पाकच्या संधुने दिप्ती शर्माला त्रिफळाचीत केले. दिप्तीने 57 चेंडूत दोन चौकारांसह 40 धावा जमविल्या. संधुने भारताला आणखी एक धक्का देताना कर्णधार मिताली राजला 9 धावांवर झेलबाद केले. निदा दारने हरमनप्रित कौरला 5 धावांवर तसेच त्यानंतर रिचा घोषला एका धावेवर बाद करून भारतीय संघावर दडपण आणले. भारताची यावेळी स्थिती 5 बाद 112 अशी होती. सलामीच्या स्मृती मानधनाने 75 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 52 झळकविल्या. पाकच्या अमीनने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्मृतीला टिपले.
पूजा-स्नेहची विक्रमी शतकी भागीदारी
पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी भारताचा डाव सावरताना सातव्या गडय़ासाठी 122 धावांची भागिदारी केली. डावातील शेवटच्या षटकांतील दुसऱया चेंडूवर पूजा वस्त्रकार सनाच्या गोलंदाजी त्रिफळाचीत झाली. तिने 59 चेंडूत 8 चौकारांसह 67 धावा जमविल्या. स्नेह राणा 48 चेंडूत 4 चौकारांसह 53 धावांवर नाबाद राहिली तर झुलन गोस्वामीने 1 चौकारांसह नाबाद 6 धावा जमविल्या. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सातव्या गडय़ासाठीची पूजा आणि स्नेह राणा यांच्यातील 122 धावांची ही सर्वोच्च भागिदारी आहे. भारताच्या डावात 1 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे नीदा दार आणि संधु यांनी प्रत्येकी दोन तर बेग, अमीन आणि सना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 25 षटकाअखेर पाकची स्थिती 5 बाद 78 अशी केविलवाणी झाली होती. पहिल्या पॉवर प्लेअखेर पाकने बिनबाद 26 धावा जमविल्या होत्या. 11 व्या षटकांत गायकवाडने सलामीच्या झवेरिया खानला 11 धावांवर गोस्वामीकरवी झेलबाद केले. कर्णधार महारूफने दोन चौकारांसह 15 धावा जमविल्या. दिप्ती शर्माने महारूफला झेलबाद केले. त्यानंतर स्नेह राणाने सोहेलला 5 धावांवर बाद केले तर झुलन गोस्वामीने सलामीच्या अमीनला बाद करून आपल्या संघासमोरील महत्त्वाचा अडथळा दूर केला. अमीनने 64 चेंडूत 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. गोस्वामीने दारला 4 धावांवर झेलबाद करीत दुसरा बळी मिळविला. रियाजने 11 धावा जमविल्या. राजेश्वरी गायकवाडने पाकचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. सनाने 1 चौकारांसह 17, नवाजने 1 चौकारांसह 12 तर डायना बेगने 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. बेग शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाली. पाकचा डाव 43 षटकांत 137 धावांत आटोपला. भारतातर्फे गायकवाडने 31 धावांत 4, गोस्वामीने 26 धावांत 2, स्नेह राणाने 27 धावांत 2, मेघना सिंगने 21 धावांत 1 तर दिप्ती शर्माने 31 धावांत 1 गडी बाद केला. पाकच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाठलाग करताना पाक महिला संघाचा हा 15 वा पराभव आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढील सामना यजमान न्यूझीलंडबरोबर येत्या गुरूवारी होणार आहे.
सचिनकडून संघाचे अभिनंदन
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकचा पराभव करून विजयी सलामी देणाऱया भारतीय महिला संघाचे माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकरने खास अभिनंदन केले आहे.
या सामन्यात स्नेह राणा तसेच पूजा वस्त्रकार यांच्या भक्कम फलंदाजीला अष्टपैलू कामगिरीची साथ मिळाल्याने भारताला पाकवर मोठा विजय मिळविता आला, असेही सचिनने म्हटले आहे. क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग सिंग ठाकुर तसेच माजी कसोटीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाचे खास अभिनंदन केले आहे. राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्याने भारताला हा सामना मोठय़ा फरकाने जिंकता आला, असे सेहवागने म्हटले आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 7 बाद 244 (स्मृती मानधना 52, दिप्ती शर्मा 40, मिताली राज 9, हरमनप्रित कौर 5, घोष 1, स्नेह राणा नाबाद 53, पूजा वस्त्रकार 67, गोस्वामी नाबाद 6, नीदा दार 2-45, संधु 2-36, बेग 1-61, अमीन 1-43, सना 1-58).
पाक 43 षटकांत सर्वबाद 137 (अमीन 30, झवेरिया खान 11, महारूफ 15, सोहेल 5, दार 4, रियाज 11, सना 17, नवाज 12, डायना बेग 24, गायकवाड 4-31, गोस्वामी 2-26, स्नेह राणा 2-27, मेघना सिंग 1-21, दिप्ती शर्मा 1-31).
सहा विश्वचषक खेळणारी मिताली बनली पहिली महिला क्रिकेटपटू
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज यावेळी विक्रमी सहाव्या विश्वचषक स्पर्धेत खेळत असून हा माईलस्टोन गाठणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिचीच सहकारी झुलन गोस्वामी पाचव्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. पुरुष विभागात भारताचा सचिन तेंडुलकर व पाकचा जावेद मियांदाद यांनी सहा विश्वचषक स्पर्धांत सहभागी होण्याचा विक्रम केला होता. तेंडुलकरने 1992 ते 2011 या कालावधीत हा पराक्रम केला होता. 39 वर्षीय मितालीने 2000 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकात भाग घेतला होता. त्यानंतर 2005, 2009, 2013, 2017 या वर्षीही ती सहभागी झाली होती. हा विक्रम करताना तिने न्यूझीलंडची डेबी हॉकली व इंग्लंडची चार्लोस एडवर्ड्स यांना मागे टाकले.